मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी येत्या तीन वर्षांत १ लाख ३४ हजार ७४० श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचे नियोजन केले आहे. या कामासाठी महापालिकेने एकूण नऊ शासकीय व खासगी संस्थांची नेमणूक केली असून निर्बीजीकरण उपक्रमावर सुमारे २३ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने २०१७ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील १ लाख ५३ हजार ६२२ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारित असलेल्या श्वान नियंत्रण विभागातर्फे १९९४ पासून भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी श्वानांच्या निर्बीजीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९९८ पासून अशासकीय संस्थांच्या सहभागाने हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्यात आला आहे. १९९४ पासून ऑगस्ट २०२५ पर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ५२९ भटक्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज, द बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल्स, इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, अहिंसा, यूथ ऑर्गनायझेशन इन डीफेंस ऑफ ॲनिमल आदी विविध शासकीय, अशासकीय संस्थांच्या पुढाकाराने उपक्रम राबविला जातो. महानगरपालिका प्रशासनाने श्वान निर्बीजीकरणाबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी पाठवला होता. नगरसेवकांच्या चर्चेअंती प्रस्तावाला समिती अध्यक्षांनी मंजुरी दिली.
एकूण नऊ संस्थांना निर्बीजीकरणाचे कंत्राट देण्यात आले आहे. श्वान हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून परिस्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. संबंधित प्रस्तावात सविस्तर माहिती देण्यात आली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नगरसेविका राखी जाधव यांनी याबाबत विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली. निर्बीजीकरणानंतर श्वानाला मूळ ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते. मात्र, रुग्णालयाच्या आवारातून नेलेले श्वान निर्बीजीकरणानंतर पुन्हा त्या ठिकाणी सोडू नयेत. रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांना निवारा केंद्रात पाठवावे, असे मत काँग्रेसच्या ट्युलीप मिरांडा यांनी व्यक्त केले.
वर्षानूवर्ष सातत्याने त्याच त्याच संस्थांची नेमणूक का केली जाते, असा प्रश्न एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी उपस्थित केला. श्वान निर्बीजीकरण करणाऱ्या संस्था मर्यादित असल्याने त्यांनाच कंत्राट दिले जाते, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी नमूद केले. तसेच, श्वान निवारा केंद्रासाठी शासनाकडे जागेची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
निर्बीजीकरण न केल्यास श्वानांची संख्या ४ लाखावर जाण्याची शक्यता
२०२४ मध्ये झालेल्या श्वान सर्वेक्षणानुसार मुंबईत ९०,७५७ श्वान आहेत. त्यापैकी ३३ हजार ६७१ एवढ्या (श्वान २२,४४७ व मादी श्वान ११.२२४) भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. निर्बिजीकरण न केल्यास ११.२२४ मादी श्वानांना एका वर्षात प्रत्येकी ४ पिल्ले झाली तर २०२४ ते २०३३ या दहा वर्षांत भटक्या श्वानांची संख्या ४ लाख ४८ हजार ९४७ इतकी वाढण्याची शक्यता आहे.
