मुंबई : मान्सूनपूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेने वृक्षछाटणीची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, या वृक्षछाटणीदरम्यान बहुतांश झाडांवरील पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होत असल्याचा दावा काँग्रेसच्या नगरसेविका ट्यूलिप मिरांडा यांनी केला. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, वृक्षछाटणी करताना महापालिका या गोष्टींची कशाप्रकारे काळजी घेणार, काय उपाययोजना करणार, याबाबत त्यांनी माहिती सादर करण्याची मागणी केली.

महानगरपालिकेच्या उद्यान खात्याने मुंबईतील धोकादायक झाडांच्या छाटणीला सुरुवात केली आहे. वृक्षछाटणीच्या अनुषंगाने मुंबईत महापालिकेने ९२ हजार झाडांचे सर्वेक्षण केले असून आतापर्यंत २६ हजारहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण झाली आहे. तसेच, शासकीय व खाजगी संस्थांच्या हद्दीतील वृक्षछाटणीबाबत संबंधितांना साडेसात हजारांहून अधिक नोटीस धाडल्या आहेत. दरम्यान, काँगेसच्या नगरसेविका ट्यूलिप मिरांडा यांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वृक्षछाटणीदरम्यान पक्ष्यांची घरटी तोडली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

मुंबईत बहुतांश झाडांवर पक्ष्यांची घरटी असून झाडांची छाटणी करताना कंत्राटदारांकडून त्याबाबत दक्षता घेतली जात नाही. सध्या अनेक पक्ष्यांचे अंडी घालण्याचे दिवस आहेत. घरटी असलेली फांदी तोडल्यास ते खाली पडते. त्यातील अंडी फुटतात. त्यातून काही वेळा त्यातून पूर्ण वाढ न झालेली पिल्ले बाहेर पडतात. त्यांना वेळेत मदत देखील मिळत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, प्रत्येक विभागात वृक्षछाटणी करण्यापूर्वी संबंधित विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी झाडांची पाहणी करून कंत्राटदारांना आवश्यक त्या सूचना कराव्या. यासाठी वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, ज्या फांदीवर घरटे आहे, ती फांदी तोडू नये, किंवा तोडणे अत्यावश्यक असल्यास घरट्याची अन्य ठिकाणी सोय करावी, अशीही मगानी त्यांनी केली.

महापालिका अधिकाऱ्यांनी वृक्षछाटणीदरम्यान या बाबींची कशाप्रकारे काळजी घेतली जाईल, याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

….तरच शहरी जैवविविधतेचे रक्षण

वृक्षछाटणी आणि पक्ष्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पर्यावरणीय समतोलाशी थेट जोडलेला आहे. भारतात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत अनेक पक्षी संरक्षित आहेत. त्यांच्या घरट्यांचे नुकसान करणे हे कायद्याच्या दृष्टीने गंभीर मानले जाऊ शकते. मार्च ते जून हा बहुतांश प्रजातींच्या पक्ष्यांचा प्रजनन हंगाम असल्याने या काळात वृक्ष छाटणी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. छाटणीपूर्वी झाडांची तपासणी, घरटी असल्यास त्यांचे संरक्षण, तसेच आवश्यक असल्यास बचाव पथकांची मदत घेतल्यास शहरी जैवविविधतेचे रक्षण होऊ शकते.