मुंबई : मुंबईमधील आणखी दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यात एमआयएमची एक नगरसेविका आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षाची एक नगरसेविका अशा दोघींचा समावेश आहे. एमआयएमच्या एका नगरसेविकेचे पद आधीच रद्द झाले आहे. त्यामुळे एमआयएमचे संख्याबळ दोनने घटले आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे संख्याबळही दोनवर आले आहे. मुंबई महापालिका सभागृहात शुक्रवारी महापौर रितू तावडे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.

मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिंकून आलेल्या २२७ नगरसेवकांपैकी तब्बल एक तृतीयांश नगरसेवकांच्या विजयाला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी आव्हान दिले आहे. जातीबाबत चुकीची माहिती देणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि अन्य माहिती लपवणे अशा विविध कारणांच्या आधारे या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यातील जात पडताळणीबाबतचे निकाल लागत आहेत. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे पद रद्द होण्याची येत्या काळात शक्यता आहे.

एमआयएमचे संख्याबळ घटले

गेल्या महिन्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे कांजूरमार्ग येथील नगरसेवक दीपक सावंत यांचे नगरसेवक पद जातपडताळणीत बाद झाले होते. तसेच गोवंडी येथील प्रभाग क्रमांक १३७ मधील एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान पटेल यांचेही नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यातच आता एमआयएमच्या आणखी एका नगरसेविकेचे पद रद्द झाले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आले होते. त्यांचे संख्याबळ आता सहा झाले आहे.

नवाब मलिक यांच्या पुतणीचे पद रद्द

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कुर्ला येथील प्रभाग क्रमांक १७० मधील नगरसेविका बुशरा कप्तान मलिक यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचेही नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे, अशी घोषणा महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी महापालिकेच्या विशेष सभेत केली. बुशरा मलिक या माजी नगरसेवक कप्तान मलिक यांच्या स्नुषा आहेत. माजी आमदार नवाब मलिक हे कप्तान मलिक यांचे बंधू आहेत. तर नवाब मलिक यांची बहीण डॉ. सईदा खान या देखील विद्यमान नगरसेविका आहे.

यांना मिळणार संधी

प्रभाग क्रमांक १७० मध्ये बुशरा मलिक यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या ऍड. रंजिता केतन दिवेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. दिवेकर या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ वाढण्याची शक्यता आहे. तसेच प्रभाग क्रमांक १३८ मध्ये रोशन इरफान शेख यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या महफूज शेख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. महफूज शेख हे समाजवादी पक्षाचे आहेत.