मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे आता येत्या सोमवारी राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा महापालिका सभागृहात होण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारी महापालिकेची महासभा असून त्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी चार नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या अनुभवी नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यामुळे, राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. समितीच्या निर्णयाच्या आधारे मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्रव्यवहार करून राऊत यांच्याविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. या पत्रव्यवहाराहाविरोधात राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र न्यायालयाने राऊत यांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे येत्या सोमवारी राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा सभागृहात होण्याची शक्यात आहे.
यापूर्वी चार जणांचे नगरसेवक पद रद्द यापूर्वी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी चार नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यात प्रभाग क्रमांक १३८ च्या एमआयएमच्या नगरसेविका रोशन शेख, भांडूप प्रभाग क्रमांक १११ मधील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक दीपक राजाराम सावंत, गोवंडी येथील प्रभाग क्रमांक १३७ मधील एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान पटेल आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कुर्ला येथील प्रभाग क्रमांक १७० नगरसेविका बुशरा कप्तान मलिक अशा चार नगरसेवकांचा समावेश आहे. आता विशाखा राऊत यांच्या नावाची घोषणा झाल्यास ही संख्या पाच होईल.
नवीन नगरसेवकांच्या नावाची घोषणा मात्र नाही
दरम्यान, चार नगरसेवकांचे पद रद्द झालेले असले तरी त्यांच्या जागी नवीन नगरसेवकांच्या नावांची घोषणा अद्याप झालेली नाही. चार नगरसेवकांपैकी बुशरा मलिक यांनी पुढील प्रक्रियेला न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. अशा प्रकरणांमध्ये शक्यतो दुसऱ्या क्रमांकाची मते मिळणाऱ्या उमेदवाराला संधी मिळू शकते. मात्र त्याकरीता त्या उमेदवाराला लघूवाद न्यायालयात दाद मागावी लागते. लघु वाद न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अद्याप कोणत्याच नवीन नगरसेवकाच्या नावाची घोषणा झालेली नाही. विशाखा राऊत यांच्या प्रभागात प्रिया सरवणकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांनी लघुवाद न्यायालयात धाव घेतलेली आहे. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय आलेला नाही.
