मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहरातील वृक्षांच्या संवर्धनासाठी हाती घेतलेल्या ‘वृक्ष संजीवनी’ अभियानात महिनाभरात तब्बल ५३११ झाडांना नवसंजीवनी मिळाली. त्या अभियानातून झाडांवरील फलक, खोडांमध्ये ठोकलेले खिळे, केबल्स काढून टाकण्यात आल्या. तसेच, १०७१ झाडांच्या बुंध्याशी केलेले काँक्रीटीकरण हटविण्यात महापालिकेच्या उद्यान खात्याला यश आले. महानगरपालिकेमार्फत २०२२ पासून ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या उद्यान विभागाने एप्रिल महिन्यात मुंबईतील सार्वजनिक रस्ते व उद्यानांतील झाडांसाठी वृक्ष संजीवनी अभियान राबविण्यात आले. मुंबईत सद्यस्थितीत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष असून त्यापैकी १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रस्त्यांलगत, उद्यानांमध्ये व महापालिकेच्या इतर जागांवर आहेत. मात्र, बहुतांश झाडांची स्थिती दयनीय झाली असून त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्यालगत काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.

तसेच, बहुतांश झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकून दोरे, बॅनर लावण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या समस्यांच्या विळख्यातून झाडांची सुटका करण्याच्या हेतूने हे अभियान सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत १ ते ३० एप्रिल या कालावधीत मुंबईतील सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांभेवतीचे सिमेंटकॉक्रीट काढून लाल माती टाकणे, वृक्षांच्या खोडांवरील खिळे, जाहिरातफलक, दोऱ्या, केबल्स वायर काढणे, पदपथ व रस्त्यांवर आलेल्या फांद्या व झावळ्या काढणे, झाडाच्या खोडाला गेरू – चुना लावणे आदी कार्यवाही उद्यान खात्यामार्फत करण्यात आली.

या अभियानामुळे तब्बल ५३०० झाडांना नवसंजीवनी मिळाली. झाडांच्या खोडातून सुमारे ५०.०९७ किलो खिळे काढण्यात आले. तसेच, १०७१ झाडांच्या बुंध्याशी असलेले काँक्रिटीकरण हटवून तेथे लाल माती टाकण्यात आली. तसेच ११०२ झाडांवर लावलेले पोस्टर काढण्यात आले. या अभियानात ४१४ विद्यार्थी, स्वयंसेवक सहभागी झाले होते.गतवर्षी म्हणजेच (२०२५) हाती घेण्यात आलेल्या ‘वृक्ष संजीवनी’ अभियानादरम्यान एकूण ३४० वृक्षांभोवतीचे सिमेंटकॉक्रीट काढून लाल माती टाकण्यात आली होती. तसेच १४६० वृक्षांवरील जाहिरात फलक काढण्यात आले होते. झाडांच्या बुंध्यांतून एकूण १७.४३ किलो खिळे काढण्यात आले होते.

भविष्यात असा धोका… वृक्षांभोवती करण्यात येत असलेल्या सिमेंट कॉक्रीटीकरणामुळे जमिनित पाणी न मुरल्याने मुळांची वाढ खुंटते व कोरड्या उष्णतेमुळे मुळे कुजून झाडे मृत होण्याची शक्यता वाढते. तसेच विद्युत रोषणाई, केबल्स, खिळे, जाहिरात फलक यामुळेही झाडांना इजा होते व खोडाला आलेल्या जखमा कालांतराने मोठ्या होऊन वृक्ष खोडातून तुटून पडण्याची शक्यता वाढते. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष जतन व संवर्धन अधिनियमातील कलम ७ (च) अन्वये ”वृक्ष व वनस्पती यांचे मानवी जीवनात जे महत्त्वाचे स्थान आहे, त्याबद्दल लोकमत तयार करणे व वृक्षांप्रती जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हे वृक्ष प्राधिकरणाच्या कर्तव्यापैकी एक आहे. त्या अनुषंगाने उद्यान खात्यातर्फे हे अभियान राबविले जाते.