मुंबई : मुंबई महापालिकेच्या १७ पैकी सहा प्रभाग समित्यांच्या अधक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. या निवडणुकीसाठी काँग्रेसने शिवसेनेला (ठाकरे) पाठिंबा जाहीर केला होता. मात्र तरीही लालबाग शिवडीचा भाग असलेल्या ‘एफ दक्षिण’ व ‘एफ उत्तर’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी महापौर, अनुभवी नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे) मानसी सातमकर यांचा विजय झाला.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे श्रद्धा जाधव यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसने घात केला आणि शिवसेनेची (शिंदे) खेळी यशस्वी झाली. तर दुसरीकडे मालाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकाचा विजय झाला आणि शिवसेनेसोबत (शिंदे) असलेल्या अजित रावराणे यांना पराभव पत्करावा लागला.
मुंबई महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यापैकी तीन प्रभाग समिती अध्यक्ष बिनविरोध निवडून आले. तर तीन प्रभाग समित्यांसाठी निवडणूक पार पडली. दहिसर आणि बोरिवलीचा समावेश असलेल्या आर उत्तर व आर मध्य प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रकाश दरेकर, कांदिवलीच्या आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या लीना देहरकर व गिरगाव, ग्रॅन्टरोडचा समावेश असलेल्या सी, डी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपचे आकाश पुरोहित यांची बिनविरोध निवड झाली. तर चर्चगेट, कुलाबा, भायखळा याचा समावेश असलेल्या ए, बी, ई प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्ञानराज निकम विजयी झाले असून त्यांनी भाजपाचे नगरसेवक रोहिदास लोखंडे यांचा दोन मतांनी पराभव केला. मालाडमधील पी पूर्व व पी पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे हैदरअली अस्लम शेख विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अजित रावराणे यांचा दोन मताने पराभव केला.
ठाकरेंना शिवसेनेचा (शिंदे) धक्का
लालबाग, शिवडी, वडाळा परिसराचा समावेश असलेल्या एफ उत्तर व एक दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे) मोठा धक्का बसला. शिवसेना (ठाकरे), काँग्रेस महाविकास आघाडीचे बहुमत असताना, ठाकरेंच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीपूर्वी मोठी खेळी खेळत ठाकरेंना जोरदार धक्का दिला आहे. शिंदे गटाने राजकीय व्यूहरचना आखून काँग्रेस नगरसेविका आयशा सोफियान वणू व समाजवादी पार्टीच्या नगरसेविका इरम सिद्दिकी यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवले. त्यामुळे जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी सातमकर निवडून आल्या.
असा झाला पराभव
एफ उत्तर व एक दक्षिण प्रभाग समितीमध्ये भाजपचे ५, ठाकरे गटाचे ६, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३, काँग्रेस १, समाजवादी पक्ष १ आणि मनसेचा १ असे एकूण १७ नगरसेवक आहेत. महायुतीकडे भाजप ५ व शिवसेना ३ असे ८ नगरसेवक आहेत. तर ठाकरे गटाकडे ६, काँग्रेस १ व मनसे १ अशी ८ मते होती. त्यामुळेच सपाच्या नगरसेविकेचे मत निर्णयक ठरणार होते. सपा नगरसेविका तटस्थ राहिली असती तरी चिठ्ठीवर अध्यक्ष ठरणार होता. पण निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि सपाचे नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे शिवसेनेच्या मानसी सातमकर यांना ८, तर श्रद्धा जाधव यांना ७ मते पडली. त्यामुळे जाधव यांचा एक मतांनी पराभव झाला.
स्पष्टीकरण मागवणार
प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने बुधवारी जाहीर केली होती. तसेच पक्षादेशही काढला होता. मात्र तरीही आएशा वणू गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याकडून याबाबतचे स्पष्टीकरण मागण्यात येणार असल्याचे गटनेते अशरफ आझमी यांनी सांगितले.
कुठे कोणाचा विजय
उत्तर व आर मध्य – प्रकाश दरेकर, (भाजप)
आर दक्षिण – लीना देहरकर (भाजप)
सीडी – आकाश पुरोहित (भाजप)
एफ उत्तर व एक दक्षिण – मानसी सातमकर (शिवसेना -शिंदे)
एबीई – ज्ञानराज निकम (काँग्रेस)
पी पूर्व व पी पश्चिम – हैदरअली अस्लम शेख
