मुंबई : मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष विशेष समित्या आणि प्रभाग समित्यांच्या निवडणूकांकडे लागले आहे. पालिकेच्या २५ विभाग कार्यालयांचा समावेश असलेल्या १७ प्रभाग समित्यांसाठी बुधवारी राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी अर्ज भरले. १७ प्रभाग समित्यांपैकी ११ प्रभाग समित्या बिनविरोध झाल्या आहेत. सहा प्रभाग समित्यांमध्ये निवडणूक होणार आहे. तर दोन प्रभाग समित्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ समसमान आहे. त्यामुळे याठिकाणी सोडत काढावी लागणार आहे.
पालिकेच्या स्थायी, शिक्षण, बेस्ट आणि सुधार या समित्यांच्या निवडणूकांनंतर आता प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहेत. ५, ६, व ७ मार्च रोजी या प्रभाग समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी ४ मार्च रोजी अर्ज भरण्यात आले. पालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना बहुतांशी प्रभाग समित्यांवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र यावेळी बहुतांशी समित्यांवर भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे महायुतीकडे जास्त प्रभाग समित्या जाणार आहेत. तर शिवसेना (ठाकरे), मनसे आणि कॉंग्रेसचे संख्याबळ प्रभाग समित्यांमध्ये कमी असल्यामुळे त्यांना कमी प्रभाग समित्या मिळणार आहेत. मात्र ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांनी प्रभाग समित्यांमध्ये एकमेकांना पाठिंबा दिला असून प्रभाग समित्या राखण्यासाठी तडजोड केली आहे. तर ज्या प्रभाग समित्या बिनबिरोध होणार आहे त्यातील अकरापैकी आठ समित्यांवर भाजपचे नगरसेवक आहेत. तर दोन ठिकाणी शिवसेना (ठाकरे) आणि एक ठिकाणी शिवसेना (शिंदे) यांचे नगरसेवक आहेत.
दादरमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे
दादर जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे युतीच्यावतीने मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी अर्ज भरला आहे. तर शिवसेना (ठाकरे) गटाचे उमेदवार जोसेफ कोळी यांनीही अर्ज भरल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये एकत्र असलेले ठाकरे बंधूंचे शिलेदार आता एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधूंमध्ये फारसे आलबेल नसल्याची चर्चा आहे.
एस व टी प्रभाग समितीमध्ये चिठ्ठी ठरवणार अध्यक्ष
भांडुप एस व मुलुंड टी प्रभाग समिती भाजपा शिवसेना महायुतीचे १० व शिवसेना ठाकरे गट काँग्रेस, मनसे आघाडी यांचे १० असे समसमान नगरसेवक असल्यामुळे येथे दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडणार आहेत. त्यामुळे सोडत काढून अध्यक्ष कोण होणार, हे ठरणार आहे. तर काँग्रेसने भांडूप, मुलुंड, शिवडी, लालबाग, वडाळा परिसरात शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.
या प्रभाग समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड
गिरगाव, ग्रॅंटरोड, ताडदेव (सी-डी) – आकाश पुरोहित, भाजपा
अंधेरी पश्चिम (के पश्चिम )- रोहन राठोड, भाजपा
अंधेरी, विलेपार्ले ( के-दक्षिण/उत्तर) – प्रकाश मुसळे, भाजपा
गोरेगाव (पी-दक्षिण) – श्रीकला पिल्ले, भाजपा
कांदिवली (आर दक्षिण) – लीना देहरकर, भाजपा
बोरिवली, दहिसर (आर-मध्य/उत्तर) – प्रकाश दरेकर, भाजपा
चेंबूर, गोवंडी (एम पश्चिम) – आशा मराठे भाजपा
विद्याविहार (एन) – अश्विनी मते, भाजपा
प्रभादेवी, वरळी (जी दक्षिण) – पद्मजा चेंबूरकर, शिवसेना(ठाकरे)
वांद्रे पूर्व आणि पश्चिम (एच पूर्व/पश्चिम) – रोहिणी कांबळे, शिवसेना (ठाकरे)
कुर्ला (एल) – विजयेंद्र शिंदे, शिवसेना (शिंदे)
