मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय ९५ टक्के भरल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपट्टी वाढवण्याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तब्बल चार वर्षांपासून पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. मात्र पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला येत असलेल्या खर्चात वाढ होत असल्यामुळे यंदा पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्याकरीता आढावा घेण्यात आला असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच तयार केला जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
मुंबईकरांना आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत दरवर्षी जास्तीत जास्त आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव २०१२ मध्ये स्थायी समितीमध्ये मंजूर केला होता. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात पाणीपट्टीत काही टक्के वाढ करण्यात येते. मात्र पालिका निवडणूक होईल या भीतीने २०२२ पासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. त्यामुळे आधीच मुंबई महापालिकेला वार्षिक १०० कोटी महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. यंदा निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ करण्याबाबत पालिका प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. कित्येक किलोमीटर लांबून पाणी वाहून आणि शुद्धीकरण करून मुंबईकरांना त्याचा पुरवठा केला जातो. मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण करणे, पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, गळती दुरुस्त करणे, देखभाल व दुरुस्ती करणे अशी विविध कामे करावी लागतात.
या सर्व कामांसाठी पालिकेला येत असलेल्या खर्चाच्या तुलनेत मुंबईकरांना पाणीपट्टी आकारली जाते. दरवर्षी या खर्चात वाढ होत आहे. या खर्चाचा आढावा घेऊन लेखापाल विभागामार्फत पाणीपट्टीत वाढ सुचवली जाते. तसेच पालिकेने निःक्षारीकरण प्रकल्प, गारगाई प्रकल्प, भांडूप जल शुद्धीकरण प्रकल्पाचे अद्ययावतीकरण असे कोट्यवधी रुपये खर्चाचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे यंदा पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीसाठा खालावला होता. तसेच ‘अल निनो’मुळे पाऊस ओढ देईल या शक्यतेमुळे १० टक्के पाणी कपातही लागू करण्यात आली आहे. मात्र अधेमध्ये पडलेल्या पावसाने धरणसाठ्यात चांगली वाढ झाली असून ९५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दरवर्षी साधारण ऑक्टोबरनंतर पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात येतो. प्रस्ताव मंजूर झाल्यास जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने पाणीपट्टी लागू केली जाते.
पाण्यासाठी खर्च २६ रुपये, विक्री दर ६ रुपये
मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेला १००० लिटरमागे २६.९३ रुपये इतका खर्च येतो. मात्र प्रत्यक्षात इमारतींमधील मुंबईकरांना पाणी ६.३६ रुपये प्रति लिटर दराने दिले जाते. त्यामुळे रहिवाशांना दरमहा जास्तीत जास्त १२८ रुपये पाणीपट्टी भरावी लागते. पाणीपुरवठा असा होतो झोपडपट्टीत प्रति माणशी प्रति दिवशी ४५ लिटर इमारतीतील रहिवाशांना प्रति माणशी प्रति दिवशी १३५ लिटर एकूण जलजोडण्या – ४ लाख १८ हजार ९०६
