मुंबई : मुंबईतील अनधिकृत पथविक्रीसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याअंतर्गत नागरिकांना ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारी नोंदवता येणार आहेत.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनात नागरी समस्यांबाबत तक्रारी, सूचना आणि प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जात आहे. तशीच सुविधा पालिकेने अनधिकृत पथविक्रीबाबतच्या तक्रारींसाठी उपलब्ध करून दिली आहे.
रस्ते, खड्डे यांसह अन्य विविध सुविधांबाबत नागरिकांकडून महानगरपालिकेकडे १९१६, समाजमाध्यमे आदी माध्यमांतून तक्रारी व सूचना येतात. तसेच, महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा देखील कार्यान्वित केली आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित तक्रारींसाठी नागरिकांना वेगवेगळ्या प्रणालींचा वापर करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना अधिक व्यापक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून यंदा ”मायबीएमसी मार्ग” ही एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
दरम्यान, अनधिकृत पथविक्रीच्या अनुषंगाने तक्रारी नोंदवण्यासाठी नागरिकांना व्हॉटस्ॲप क्रमांक उपलब्ध करुन देण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करत महानगरपालिकेने ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावरील ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ मध्ये अनधिकृत पथविक्रीबाबत तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
तक्रार कशी करायची?
व्हॉट्सॲप चॅटबॉट’वर ‘नमस्कार- मराठी- नागरिक- नागरी सेवा- तक्रार निवारण- तक्रार सबमिट करा- तक्रार प्रकार- फेरीवाले- बेकायदेशीर फेरीवाल्यांचा उपद्रव- ठिकाण- थेट छायाचित्र’ या क्रमानुसार जाऊन तक्रार नोंदवता येईल.
