मुंबई : मुंबईकरांना यंदाही होळीच्या सणाला घरपोच पुरणपोळीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. होळी सणाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या पुरणपोळ्या मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत.

मुंबईतील गरजू आणि होतकरू महिलांना आर्थिक सक्षम तसेच स्वावलंबी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक सहाय्याने महिला बचत गट निर्माण करण्यात आले आहेत. नियमित उपक्रमांच्या पलीकडे जाऊन या महिला बचत गटांना नाविन्यपूर्ण व व्यवसायाभिमुख उपक्रमांच्या मदतीने अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपक्रम राबवत असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या या महिला बचत गटांनी गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्यानिमित्ताने देखील पुरणपोळी महोत्सव राबविला होता. त्याला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता सार्वजनिक श्रीगणेशोत्सवात या महिला बचत गटांकडून ‘मोदक महोत्सव’ चे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुरणपोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे.

होळीच्या दिवशी पुरणपोळीला खूप मागणी असते. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करून महिला बचत गटांनी हा महोत्सव सुरू केला आहे. या अंतर्गत पारंपरिक पुरणपोळी ग्राहकांना मिळणार आहेत. ज्यांना बचत गटांनी तयार केलेली पुरणपोळी हवी असेल त्यांनी https://shgeshop.com या संकेतस्थळावर १ मार्च पर्यंत ऑनलाईन मागणी नोंदवायची आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर, होळीच्या दिवशी ग्राहकांना पुरणपोळी घरपोच मिळणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे.

कुठे कराल नोंदणी..

मुंबई महापालिकेतर्फे २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान ‘पुरणपोळी महोत्सव २०२६’ सुरु आहे. या अंतर्गत https://shgeshop.com या संकेतस्थळावर नागरिक ऑनलाईन नोंदणी करू शकतात. दिनांक २ मार्च २०२६ रोजी पुरणपोळ्यांचे घरपोच वितरण केले जाणार आहे.