मुंबई : नायगाव परिसरातील पाण्याच्या टाकीत डासांच्या अळ्यांचे उत्पत्तीस्थान शोधण्यासाठी शनिवारी सकाळी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागातील कामगाराचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे कीटकनाशक विभागात खळबळ उडाली असून डासांच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यांचा नायनाट करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य आजाराचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कीटकनाशक विभागातर्फे डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यात येतात. पावसाळ्यापूर्वीच ही मोहीम हाती घेण्यात येते. पावसाळ्यातही ती अखंड सुरू असते. या मोहिमेचा भाग म्हणून महापालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील नायगाव पोलीस कॅम्पमधील इमारतीतील पाण्याच्या टाकीची तपासणी करण्यासाठी कीटकनाशक विभागातील कामगार पांडुरंग तोडकर (४७) शनिवारी सकाळी गेले होते. लोखंडी स्टॅण्डवरील टाकीची तपासणी करण्यासाठी ते वर गेले होते. त्यावेळी तोल जाऊन ते खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पाण्याच्या टाकीच्या आसपास पडलेल्या लोखंडी सळ्यांमुळे ते गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे पाण्याच्या टाक्यांच्या आसपास टाकण्यात येणारे सामान, अडगळीतील वस्तूंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे या घटनेवरून उघडकीस आले आहे. परिणामी, या विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पांडुरंग तोडकर यांच्या मृत्युमुळे कर्मचारी संघटनांनीही प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.