मुंबई : मुख्यमंत्री कार्यालय, पालिका मुख्यालय, महापौर कार्यालय, मुंबई शेअर बाजार, शाळा, चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान, गायक दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमाचे ठिकाण आणि मुंबईतील तीन न्यायालये… अशी दहा ठिकाणे आणि धमक्यांचे चार ई-मेल. गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या ई-मेल वा ‘आयपी’ पत्त्यांवरून ही पत्रे पाठवण्यात आली असली, तरी त्यामागे एकच सूत्रधार असावा, ही शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
गेल्या सहा महिन्यांत, १० जून, ७ ऑगस्ट, २३ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर अशा चार वेगवेगळ्या दिवशी बॉम्बस्फोटाच्या धमक्या देणारे चार ई-मेल पाठविण्यात आले. या चारही प्रकरणांत आझाद मैदान पोलीस ठाण्यात स्वतंत्र अदखलपात्र नोंदी करण्यात आल्या आहेत. धमक्यांच्या या चारही ई-मेलचे पत्ते आणि त्यांचे आयपी पत्ते वेगवेगळे आहेत.
मात्र, ई-मेलमधील भाषा, धमकी देण्याची पद्धत आणि मजकुराची मांडणी यांत पोलिसांना साम्य आढळले आहे. या ई-मेलमध्ये प्रामुख्याने पंजाबी भाषेचा वापर असून, त्यात खलिस्तानविषयक उल्लेख आहे. काही मेलमध्ये शेवटी तमिळ भाषेतील मजकूरही होता. त्यातील भाषिक आणि आशयात्मक साम्यामुळे एकाच व्यक्तीचा सहभाग असावा. तसेच हे मेल पाठवताना आभासी खासगी जाळ्याचा (व्हीपीएन) वापर करण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. ‘व्हीपीएन’ तंत्रज्ञानामुळे ई-मेल प्रत्यक्ष ज्या ठिकाणावरून पाठवण्यात आले, त्या ऐवजी दुसऱ्याच ठिकाणाचे स्थान दिसते. काही वेळा हे स्थान देशाबाहेरील असल्याचेही दिसते.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी सांगितले, की व्हीपीएनचा वापर, परदेशातील सर्व्हर आणि ई-मेल सेवा पुरवठादारांकडून माहिती मिळविण्याची वेळखाऊ प्रक्रिया यामुळे तपासाची गती बाधित होत आहे. यामुळे धमक्या देणारी व्यक्ती नेमकी कोण, तिचा उद्देश काय आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना वारंवार लक्ष्य करण्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे, हे शोधण्याचे मुंबई पोलिसांसमोरील आव्हान कायम आहे.
१० जून – मुंबई महापालिका, महापौर कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई शेअर बाजारासह काही महत्त्वाच्या ठिकाणांना धमकी
७ ऑगस्ट – महापौर कार्यालयाला धमकीचा ई-मेल
२३ ऑक्टोबर – महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील निवासस्थान, शाळा आणि दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी
२ नोव्हेंबर – मुंबईतील तीन न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेल
