Borivali Hotel Dosa Rat Extortion Case : मुंबईतील बोरिवली भागात एका प्रसिद्ध हॉटेलमधील डोशात उंदीर आढळल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलचा परवाना निलंबित केला होता. मात्र, आता याच प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, हॉटेल मालकाकडून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी दोन बहिणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी एक महिला एका मुलासह आणि दोन पुरुषांसोबत बोरिवली पश्चिमेकडील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गेली होती. तिथे म्हैसूर मसाला डोसा आणि इतर पदार्थ खात असताना, तिच्याबरोबर असलेल्या व्यक्तीला डोशात उंदीर आढळल्याचा दावा केला गेला. यानंतर हॉटेलमध्ये मोठा गोंधळ उडाला. महिलेने तातडीने पोलिसांना बोलावून या प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडीओही शूट केला होता.

व्हिडीओ व्हायरल आणि ‘एफडीए’ची कारवाई

हा व्हिडीओ २६ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत २८ सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाने या हॉटेलचा परवाना निलंबित केला, परिणामी हॉटेल मालकाला हॉटेल बंद ठेवावे लागले.

२५ लाखांची मागणी, ७ लाखांत तडजोड

दरम्यान, या प्रकरणात हॉटेल मालकाने पोलिसांत तक्रार दाखल करत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडीओ आणखी व्हायरल करण्याची आणि पोलिसांत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत आरोपी महिलांनी पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, जी नंतर तडजोडीत ७ लाखांवर ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. यातील पहिला १ लाख रुपयांचा हप्ता ३० सप्टेंबर रोजी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

उर्वरित ६ लाखांसाठी पोलिसांचा सापळा

१ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान आरोपींकडून उर्वरित ६ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास व्हिडीओ पुन्हा प्रसारित करण्याची धमकी दिली जात होती. अखेर त्रस्त झालेल्या मालकाने पोलिसांत धाव घेतली. ५ ऑक्टोबर रोजी उर्वरित पैसे देण्याच्या बहाण्याने हॉटेल मालकाने दोन्ही बहिणींना हॉटेलमध्ये बोलावले. पोलिसांच्या आधीच ठरवलेल्या सापळ्यानुसार, संबंधित महिला आणि तिची बहीण पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

कायदेशीर कारवाई सुरू

पोलिसांनी दोन्ही बहिणींना अटक न करता कायदेशीर नोटीस बजावली आहे. दोघींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही बहिणींना अटक न करता नोटीस बजावल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. दोघींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डोशात उंदीर आढळल्याचा दावा आणि त्यानंतर झालेल्या कथित पैशांच्या मागणीचा तपास बोरिवली पोलिस करत आहेत.