मुंबई : दहिसरमधून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय मुलाचा मृतदेह गुरुवारी आढळला. केतकीपाडा येथील दगडखाणीत साचलेल्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता दहिसर पोलिसांनी वर्तवली आहे.
हा मुलगा बुधवारी दुपारी आपल्या मित्रांसह केतकीपाडा येथील एका दगड खाणीच्या परिसरात फिरायला गेला होता. या दगडखाणीत पावसाचे पाणी साचल्याने तलाव तयार झाला आहे. ही मुले काही वेळ तेथे फिरत होती. मात्र पावसाला सुरुवात झाल्यानंतर सर्व मुले तेथून निघाले. मृत मुलगा नैसर्गिक विधीसाठी जाऊन येतो असे सांगून गेला होता. मात्र त्यानंतर तो मित्रांना दिसला नाही. बराच वेळ शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.
गुरुवारी दुपारी त्याचा मृतदेह पाण्याने भरलेल्या दगडखाणीत आढळला. पाय घसरून खाणीत पडून त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे