मुंबई :मुंबई महापालिकेने वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला ४ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तर दररोज तब्बल ३३ लाख मुंबईकर ज्या बेस्टने प्रवास करतात, त्या बेस्टसाठी केवळ एक हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. एकूण ८० हजार कोटींच्या अर्थसंकल्पात बेस्टच्या वाट्याला दोन टक्केही तरतूद नाही.
बेस्ट हा महापालिकेचा भाग आहे. त्यामुळे बेस्टला महापालिकेकडून आर्थिक मदत करण्याची मागणी केली जाते. नवीन गाड्यांची खरेदी, कर्मचाऱ्यांची देणी आणि इतर खर्चासाठी बेस्टला महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र बेस्टच्या पदरी निराशाच पडली आहे. बेस्ट उपक्रमाला वर्ष २०२६-२७ आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून १ हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. गेल्या वर्षी २००५-२६ मध्ये १ हजार २५० कोटी तर वर्ष २०२४-२५ मध्ये हीच तरतूद ९२८ कोटी रुपये होती. मुंबई महापालिकेने वर्ष २०१२-१३ पासून जानेवारी २०२६ पर्यंत बेस्ट उपक्रमाला १२ हजार २८ कोटी ८१ लाख इतक्या रकमेचे अर्थसाह्य केले आहे.
बेस्ट ही मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून बेस्ट आर्थिक संकटात असल्याने प्रशासनाने स्वमालकीची एकही बस खरेदी केली नाही. तर खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्वावरील बस घेतल्या. परंतु प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या अत्यंत कमी आहे. प्रवाशांना बसकरिता किमान ४० ते ५० मिनिटांची वाट पाहावी लागते. याचे कारण बेस्टच्या ताफ्यात सध्या २ हजार ७६७ बस असून यापैकी स्वमालकीच्या फक्त २४९ आणि भाडेतत्त्वावरील २ हजार ५१८ बस आहेत.
उपक्रमाने एका कंपनीकडून २ हजार १०० एसी इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी २०२२मध्ये करार केला होता. परंतु अद्याप निम्याही बस ताफ्यात आलेल्या नाहीत. उर्वरित बससाठी बेस्टने कंपनीला केवळ कारणे दाखवा नोटीसच बजावली आहे. याच कंपनीकडून आणखी २ हजार ४०० बस घेण्यासाठीही करार केला आहे. मात्र, पुरेशी आर्थिक तरतूदच नसल्याने अद्यापही खरेदी झालेली नाही.
एका बससाठी ४० ते ५० मिनिटे प्रतीक्षा
एका बससाठी मुंबईकरांना तास तास तिष्ठत उभे राहावे लागते, याचे कारण बेस्टची घटती बससंख्या.त्यात स्वमालकीच्या बस प्रचंड घटल्या आणि भाडोत्री बससंख्या देखील अपुरी आहे.
२०१९ च्या व्यवस्थापन-कामगार करारानुसार, बेस्ट बसची संख्या ३३३७राखली जाणार होती.
गेल्या पाच वर्षांत बससंख्या मात्र ६७ टक्के घटली. बेस्टने नव्या बस घेतल्या पण भाडोत्री!
वर्षाकाठी संख्या घटल्याने मुंबईकरांची ही दुसऱ्या क्रमांकाची लाईफलाईन रोज रखडते आहे.
प्रतिक्रिया
कोस्टल रोडच्या निर्मिती करण्यासारख्या मोठ्या प्रकल्पांकरिता राज्य आणि केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. समुद्रावर हक्क सांगणे आणि रस्ता बनवणे हे खूप खर्चिक असल्याने महापालिकेने असे प्रकल्प हाती घेऊ नयेत.कोस्टल रोड बनविण्याचे काम महापालिकेचे नाही. विशेषतः बेस्ट सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे. शहरात निम्मी लोकसंख्या गरीब, झोपडपट्टीत राहते. त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी स्वस्त सार्वजनिक वाहतूक आवश्यक आहे. त्यासाठी बेस्ट महत्वाची आहे. लोकलची गर्दी जास्त आहे. मेट्रोचा प्रवास महागडा आहे. त्यामुळे कोस्टल रोड प्रकल्पांवर होणारा खर्च बेस्टकडे वळवून बस खरेदी केल्या पाहिजेत. जेणेकरून मुंबईकरांना किफायतशीर प्रवास करता येईल.शहरातील वाढते वायु प्रदूषण कमी करण्यासाठी खाजगी वाहनाच्या संख्येवर आळा घालून बेस्टला प्राधान्य देणे गरजेचे आहें. – निखिल देसाई, वाहतूक तज्ज्
बेस्टची रोजची प्रवासी संख्या- ३३ लाख
एकूण बस–२७६७
स्वमालकीच्या -२४९
भाडेतत्वावरील—–२५१८
गेल्या अर्थसंकल्पातील ७२४.२२ कोटी शिल्लक
दोन हजार इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाच टक्के हिस्सा म्हणजेच १२८ कोटी ६५ लाख रुपये खर्चापोटी तसेच पंधराव्या वित्त आयोगातून मिळणारा २५० कोटी रुपयांचा निधी बसखरेदीसाठी असा एकूण १ हजार २५० कोटी रुपयांचा निधी बेस्टला दिला होता. त्यापैकी ७२४ कोटी २२ लाखांचा निधी अद्याप शिल्लक आहे.

