मुंबईत करोना रुग्णांची संख्या अद्यापही कमी झाली नसून राज्य सरकारमोर अनेक आव्हानं उभं राहण्याची शक्यता आहे. पण समाजातील काही लोक पुढाकार घेऊन मदत करत असल्याने राज्य सरकारला हातभार लागत आहे. अशाच पद्धतीने मुंबईत एका बांधकाम व्यवसायिकाने नव्याने उभारलेली १९ माळ्यांची इमारत क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी महापालिकेला दिली आहे.

मेहुल संघवी असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. “घर खरेदी केलेल्या रहिवाशांसोबत चर्चा केल्यानंतरच आम्ही हा निर्णय़ घेतला. सध्या ही इमारत करोना रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरली जात आहे,” अशी माहिती मेहुल संघवी यांनी दिली आहे. ही इमारत मालाडमधील एस व्ही रोडवर आहे. इमारतीत एकूण १३० फ्लॅट आहेत. इमारतीला राज्य सरकारकडून ओसीदेखील मिळाली आहे. इमारतीमधील फ्लॅट मालकांकडे सोपवण्यासाठी पूर्ण तयार होते.

सध्या या इमारतीत एकूण ३०० करोना रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. एका फ्लॅटमध्ये चार रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. यामध्ये मालाडचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीदेखील महत्त्वाची भूमिका निभावली. “फ्लॅट मालकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला,” असं मेहुल संघवी यांनी सांगितलं आहे.

मालाडमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने गोपाळ शेट्टी यांनी मेहुल संघवी यांच्याशी चर्चा केली होती. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मेहुल संघवी यांनीदेखील इमारत देण्यासाठी तयारी दर्शवली. “मेहुल संघवी यांच्यासारखे लोक आपला वैयक्तिक फायदा बाजूला ठेऊन इतक्या कठीण काळात मदतीसाठी पुढाकार घेत असल्याचा आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे. इतर लोकही अशा पद्दतीने पुढे येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.