Byculla Moharram poisonous capsules case: मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान वेदनाशामक गोळ्यांच्या नावाखाली उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी ३९ वर्षीय पुण्यातील व्यक्तीला अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेल्यानंतर जगाचा सूड घेण्याच्या भावनेतून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. फैय्याज प्रेमजी (३९) असे अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीचे नाव आहे.

पत्नी सोडून गेल्याचा राग

फैय्याज प्रेमजीने भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान वेदनाशामक गोळ्या म्हणून या विषारी गोळ्यांचे वाटप केले. अनेकांनी विश्वास ठेवत या गोळ्या घेतल्या आणि खाल्ल्या देखील, यामुळे अनेकांना थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवू लागल्या. पोलिसांनी प्रेमजीला अटक केल्यानंतर त्याने धक्कादायक खुलासे केले. “पत्नी सोडून गेल्यानंतर जगाचा सूड घ्यायचा होता आणि त्याने १५,००० नागरिकांना जीवे मारण्याचा कट रचला होता”, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

फैय्याज प्रेमजी मानसिकदृष्ट्या अस्थिर?

लग्न फसल्यानंतर सगळे जगच त्याच्याविरोधात गेल्याचा भाव त्याचा मनात निर्माण झाला होता. धार्मिक मिरवणुकीत अनेकांना यमसदनी थाडण्याचा त्याचा डाव होता, असे पोलिस तपासातून उघड झाले आहे. भायखळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी दीपक सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फैय्याज प्रेमजी याच्यावर मानसिक आरोग्याशी निगडीत उपचार सुरु आहेत का? याचा तपास केला जात आहे. चौकशीदरम्यान तो मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे जाणवले, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

इराणशी काय नातं?

आरोपी फैय्याज प्रेमजी याची आई आणि बहीण इराणमध्ये राहत असून, त्याचा नियमित त्यांच्याशी संपर्क होतो. फॉरेन्सिक विश्लेषणासाठी त्याचा फोन पाठविण्यात आला असून, इराणमध्ये होणाऱ्या संपर्काची देखील माहिती घेतली जात आहे. फैय्याजने यापूर्वी इराक आणि इराणमध्ये काम केल्याचे तपासातून उघड झाले आहे. त्याची बहीण डॉक्टर असल्याचे तपासात समोर आले आहे. शुक्रवारी मोहरम मिरवणुकीदरम्यान, फैय्याजने विषारी गोळ्यांचे वाटप केले.

१४,९०० गोळ्या जप्त

सलमान सय्यद (२६) या गोवंडीच्या रहिवाशाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. मिरवणुकीदरम्यान, विश्राम करत असताना बुरखा घातलेल्या महिलेने त्यांना पेन किलर असल्याचे सांगून गोळ्या दिल्या. सय्यद यांच्यासह इतरांनी देखील या गोळ्या खाल्ल्या. गोळ्या खाल्ल्यानंतरच त्यांना त्रास सुरु झाला. पोलिसांनी फैय्याजला अटक करुन त्याच्या ताब्यातून १४,९०० गोळ्या जप्त केल्या. या गोळ्या अत्यंत विषारी झिंक फॉस्फाईडच्या होत्या असे तपासातून समोर आले आहे.