मुंबई : भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील प्राणी संग्रहालयाला सिंहाची जोडी देण्याची मागणी गुजरातच्या जुनागढ येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयाने मान्य केली आहे. मात्र, त्या बदल्यात प्राणी संग्रहालयाने जिराफ किंवा एकशिंगी गेंडा किंवा कॅपुचिन माकड यांची मागणी केली आहे. तसे पत्र प्राणीसंग्रहालयाने जिजामाता उद्यान प्राणी संग्रहालयाच्या संचालकांना लिहिले आहे. पेंग्विन मात्र या प्राणी संग्रहालयाने नाकारले आहेत.
भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील प्राणीसंग्रहालयाला गेल्या चार वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा आहे. आशियाई सिंहाची जोडी मिळावी यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र पाठवले होते. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील सिंहाची जोडी मिळावी यासाठी महापौरांनी विनंती केली होती. गुजरातकडून सिंह मिळाल्यास त्याबदल्यात प्राणी किंवा पक्षी द्यावा लागणार आहे. मुंबई महापालिकेकडे २१ पेंग्विन असून पेंग्विनसह काही पक्ष्यांची यादीही सादर करण्यात आली होती. मात्र सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने पेंग्विन नाकारले आहेत. ….
प्राणी संग्रहालयाने मागितले हे प्राणी …
सिंहाच्या दोन जोडी मिळाव्या, असा प्रस्ताव सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने ठेवला होता. दुसरीकडे, आशियाई सिंहांच्या (दोन नर : दोन मादी) जोडीच्या अदलाबदलीचा प्रस्ताव भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयाने दिला होता. अदलाबदलीच्या प्रस्तावाला सक्करबाग प्राणी संग्रहालयाने तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र त्याबदल्यात जिराफाच्या दोन जोडी, किंवा भारतीय एकशिंगी गेंड्याची एक जोडी किंवा कॅपुचिन माकडाच्या तीन जोडी उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. शिवाय, हा अदलाबदली कार्यक्रम वन्यजीव संरक्षण कायदा- १९७२ मधीलतरतुदी आणि केंद्रीय प्राणी संग्रहायलय प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचना, तसेच सर्व पशुवैद्यकीय, क्वारंटाईन, वाहतूक आणि वैधानिक आवश्यकतांची पूर्तता करून राबविण्यात येईल, असेही सक्करबाग प्राणी संग्रहालयाने कळवले आहे.
यापूर्वीही प्रयत्न …..
सिंह आणण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले. प्राण्यांची देवाण-घेवाण करण्याच्या तत्वानुसार सक्करबाग प्राणी संग्रहालयाने बदल्यात प्राणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आधी दोन जोडी ग्रॅट झेब्राची मागणी करण्यात आली होती. मात्र, जिजामाता उद्यानात झेब्रा नसल्यामुळे हे प्राणी महापालिकेने विकत घेण्याचे ठरवले होते. परंतु, झेब्रा आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. जिजामाता उद्यानात झेब्रासाठी अधिवासही तयार नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला होता.
आशियाई सिंहांचे पिंजरे रिकामे ….
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या अर्थात राणीबागेच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत वाघ, बिबट्या, तरस, देशी अस्वल, पक्षी पिंजरा-१, कोल्हा, बाराशिंगा, चितळ, सांबर, आशियाई सिंह या प्राण्यांकरीता पिंजरे बांधून पूर्ण झाले आहेत. त्यापैकी काही पिंजऱ्यांमध्ये प्राणी आणले आहेत. मात्र, आशियाई सिंह आणण्यासाठी महापालिकेचे गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून जुनागढ येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून दोन जोडी सिंह आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जिजामाता उद्यानात सिंह आणण्याचे महापालिकेचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
