मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला (राणीची बाग) सिंहाची जोडी देण्याची मागणी मान्य करताना गुजरातच्या सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने ठेवलेला प्राण्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाने मान्य केला. प्राण्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव मान्य करताना

कॅपुचिन माकडाच्या तीन जोडी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राणी संग्रहालय प्रशासनाने मान्य केला असून तसे सक्करबाग प्राणी संग्रहायलयाला कळवण्यात आले होते. मात्र त्यावर सक्करबाग प्राणी संग्रहालयाने अद्याप भायखळ्याच्या प्राणी संग्रहालय प्रशासनाला काहीही कळवलेले नाही. त्यामुळे खास गुजरातला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन महापौर रितू तावडे यांनी दिले.

राणीच्या बागेला गेल्या चार वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा आहे. आशियाई सिंहाची जोडी मिळावी यासाठी रितू तावडे यांनी पुढाकार घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र पाठवले होते. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील सिंहाची जोडी मिळावी यासाठी महापौरांनी विनंती केली होती. गुजरातकडून सिंह मिळाल्यास त्याबदल्यात प्राणी किंवा पक्षी द्यावा लागणार आहे. मुंबई महापालिकेकडे २१ पेंग्विन असून पेंग्विनसह काही पक्ष्यांची यादीही सादर करण्यात आली होती. मात्र सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने पेंग्विन नाकारले होते.

आशियाई सिंहांच्या (दोन नर : दोन मादी) जोडीच्या अदलाबदलीचा प्रस्ताव भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयाने दिला होता. अदलाबदलीच्या प्रस्तावाला सक्करबाग प्राणी संग्रहालयाने मान्यता दिली व सिंहाच्या दोन जोड्यांच्या बदल्यात जिराफाच्या दोन जोड्या, किंवा भारतीय एकशिंगी गेंड्याची एक जोडी किंवा कॅपुचिन माकडाची तीन जोड्या उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती करण्यात आली होती. सक्करबाग प्राणी संग्रहालयाचा हा प्रस्ताव भायखळ्याच्या राणीच्या बागेच्या प्रशासनाने मान्य केला आहे. त्यापैकी कॅपुचिन माकडाच्या तीन जोडी उपलब्ध करून देण्याचा पर्याय मान्य करून तसे पत्रही मे महिन्यात सक्करबाग प्राणीसंग्रहालयाला पाठवण्यात आले होते.

हा अदलाबदली कार्यक्रम ‘वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’मधील तरतुदी, आणि केंद्रीय प्राणी संग्रहायलय प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचना, तसेच सर्व पशुवैद्यकीय, क्वारंटाईन, वाहतूक आणि वैधानिक आवश्यकतांची पूर्तता करून राबविण्यात येईल, असेही कळवले आहे.

परदेशातून माकडे आणणार

कॅपुचिन माकड (३ नर : ३ मादी) राणीच्या बागेत उपलब्ध नाहीत. मात्र परदेशातून ही माकडे आणण्यासाठी एखाद्या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच यासाठी आवश्यक सर्व वैधानिक परवानग्या, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण मार्गदर्शक तत्त्वे, क्वारंटाईन प्रोटोकॉल, वाहतूक नियम आणि इतर लागू प्रक्रिया पाळाव्या लागणार आहेत. ही माकडे उपलब्ध होण्याची शक्यता असल्यामुळे पालिकेने हा प्रस्ताव मान्य केला असून माकडे आणण्यासाठी ७० ते ८० लाख रुपये खर्च येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यांनी पेंग्विन आणले… आम्ही सिंह आणू …

दरम्यान, भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयाने मे महिन्यात पाठवलेल्या प्रस्तावाला अद्याप सक्करबाग प्राणी संग्रहालयाने उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता महापौर यासाठी स्वतः प्रयत्न करणार असून त्याकरीता गुजरातमध्ये जाऊन पाठपुरावा करू. असेही तावडे यांनी सांगितले. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी पेंग्विन आणले, आम्ही सिंह आणू असेही त्या यावेळी म्हणाल्या.