सध्या सगळं जग ऑनलाईन झालंय खरं, पण त्याबरोबर काही धोकेही समोर आले आहेत. या ऑनलाईनच्या मायाजालात अडकणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशेषतः महिलांना फसवण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. बरं, हे आरोपी फार कोणी वेगळे नाहीत, रोज आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या सामान्य लोकांसारखेच आहेत. या मुंबईतल्या काही प्रकरणांवर नजर टाकल्यावर आपल्याला हे लक्षात येईलच.

नकार दिल्याचा बदला म्हणून….

मुंबईतल्या मालाड भागातून एका २६ वर्षीय बेरोजगार युवकाला अटक करण्यात आली आहे. हा युवक एका महिलेचं लैंगिक शोषण करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर घडलं असं की, फेब्रुवारीमध्ये एका महिलेने पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत लैंगिक शोषणाची तक्रार केली. कोणीतरी तिला काही अश्लिल चित्र, व्हिडिओ पाठवत आहे, तिचा ऑनलाईन पाठलाग करत आहे असा या तक्रारीत उल्लेख होता.

कोणीतरी आपला पत्ता आणि फोन नंबर पॉर्न साईटवर टाकल्याचंही या तक्रारीत म्हटलं होतं. आपल्या नावाने आपल्या घरी सेक्स टॉईज पाठवल्याचंही या महिलेने सांगितलं. जेव्हा पोलिसांनी तपास केला त्यावेळी त्यांना या युवकाची माहिती मिळाली. तपासानंतर समोर आलं की हा गुन्हा करण्यासाठी हा युवक मोफत व्हीपीएन सेवा वापरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवकाने आधी कोणत्याही महिलेला अशा प्रकारचा त्रास दिलेला नाही, किंवा कोणता गुन्हाही केलेला नाही. या युवकाशी जवळीक साधायला या महिलेने नकार दिल्याने त्याने हे पाऊल उचललं.

पहिल्या पत्नीबद्दल दुसऱ्या पत्नीला कळल्याने ती माहेरी निघून गेली आणि परतण्यास नकार दिला म्हणून…..

एका २५ वर्षीय व्यावसायिकाला बुधवारी मुंबईत त्याच्या दुसऱ्या पत्नीचा सोशल मीडियावर लैंगिक छळ केल्याबद्दल आणि तिचे व्यक्तीगत फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून तिच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पीडितेने पोलिसांना सांगितले की आरोपीच्या कृत्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न रद्द झाले आणि तिने आत्महत्येचा विचार केला. तिचे समुपदेशन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

२१ वर्षीय महिला तिचे आईवडील आणि २२ वर्षांच्या बहिणीसह चाळीत राहायची. ती आरोपीसाठी काम करायची आणि प्रेमात पडल्यानंतर त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लग्न केले. मात्र, दोन महिन्यांपूर्वी तिला समजले की आरोपी आधीच विवाहित आहे आणि त्याची पहिली पत्नी गुजरातमध्ये राहते. यामुळे दाम्पत्यामध्ये भांडणे झाली आणि पीडित महिला तिच्या पालकांकडे परतली. पोलिसांनी सांगितले की तिने परत यावे अशी आरोपीची इच्छा होती पण जेव्हा ती परत आली नाही तेव्हा त्याने तिचा लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली.

त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे बनावट प्रोफाइल तयार केले आणि लग्नानंतर काढलेले तिचे व्यक्तीगत फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले. त्याने तिचे आणि तिच्या आई -वडिलांचे फोन नंबर सोशल मीडिया आणि पॉर्न साइट्सवर पोस्ट केले. त्यानंतर कुटुंबाला अज्ञात व्यक्तींकडून अश्लील कॉल येऊ लागले. त्याने ऑनलाईन प्रोफाईलच्या लिंक तिच्या नातेवाईकांना पाठवल्या. तिची मोठी बहीण लग्न करणार होती पण त्याने तिची बदनामी केली आणि तिचे लग्न रद्द झाले, असेही पोलिसांनी सांगितले.