Sushant Singh Rajput case update: मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा समाप्ती अहवाल (क्लोजर रिपोर्ट) सादर केला आहे. या अहवालात अभिनेता रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे. बेकायदेशीर कोठडी, आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा चोरीच्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे तपासात आढळले नाहीत, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली असून न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या वांद्रे येथील सदनिकेत मृतावस्थेत आढळला होता. राजपूतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या सहकाऱ्यांवर विविध आरोप केले होते. तपासात बेकायदेशीर कोठडी, आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा मालमत्तेची चोरी या आरोपांबाबत कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत, असा स्पष्ट निष्कर्ष सीबीआयने दिला आहे.

सीबीआयच्या तपासात निष्कर्ष काय ?

कोणताही आरोपी ८ ते १४ जून २०२० यादरम्यान सुशांत सोबत राहिलेला नव्हता. फक्त १० जून रोजी दुपारी २.३० वाजता शोविक चक्रवर्तीसोबत त्याचे एक व्हॉट्स ॲप संभाषण झाले होते. राजपूतची मोठी बहीण मीतू सिंह ८ ते १२ जून २०२० या काळात त्याच्या सदनिकेत राहिली होती. तसेच, सुशांतची व्यवस्थापक श्रुती मोदी फेब्रुवारी २०२० मध्ये जखमी झाल्यामुळे सुशांत सोबत राहात नव्हती, असेही सीबीआयने नमूद केले आहे.

रिया चक्रवर्तीने धमकी दिल्याचे पुरावे नाहीत

रियाने सुशांतला धमकी दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. अशा धमकीचे कोणतेही पुरावे डिजिटल किंवा इतर नोंदीमध्ये आढळले नाहीत, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय सुशांत जपूतच्या मृत्यूशी संबंधित कोणत्याही आरोपी व्यक्तीकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कुठलेही पुरावे आढळले नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे. सुशांतच्या मालमत्तेचा गैरवापर, किंवा सुशांतला बेकायदेशीर ताब्यात ठेवल्याचे काहीही पुरावने नसल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. पटना न्यायालयात या समाप्ती अहवालावर २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

सुशांतचे कुटुंबिय नाराज

सीबीआयने काढलेल्या निष्कर्षाशी सुशांतचे कुटुंब पूर्णतः असहमत आहेत. हा अहवाल म्हणजे एक देखावा आहे. जर सीबीआयला खरोखर सत्य उघड करायचे असते, तर त्यांनी सर्व पुरावे चॅट रेकॉर्ड, तांत्रिक तपशील, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केले असते. ही चौकशी अपूर्ण आणि कमकुवत आहे. आम्ही या अहवालाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असे सुशांतच्या कुटुंबाचे वकील वरुण सिंह यांनी सांगितले.