मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुख्य मार्गावर माटुंगा – मुलुंडदरम्यान आणि हार्बर मार्गावर कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान रविवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नसेल.
मध्य रेल्वे मुख्य मार्गिका
कुठे : माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी १५.४५
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे स्थानकाच्या पुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी १५.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील, माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. खोपोली येथून दुपारी १३.४८ वाजता सुटणारी खोपोली – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल आता दुपारी २.०६ वाजता सुटेल.
हार्बर मार्गावर
कुठे : कुर्ला – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी १५.३६ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी १५.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल – वाशी – पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील. ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांद्वारे प्रवास करण्याची मुभा असेल.
