मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकातील ‘जन आहार’ या उपहारगृहात अस्वच्छता आणि अन्नपदार्थ हाताळणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (आयआरसीटीसी) कठोर कारवाई केली. उपहारगृहाची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून, संबंधित कंत्राटदारावर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल स्थानकाला काही वर्षांपूर्वी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)कडून देशातील पहिले ‘इट राइट स्थानक’ म्हणून प्रमाणपत्र मिळाले होते. अन्न सुरक्षा, स्वच्छता, निरोगी आहाराची उपलब्धता आणि कचरा व्यवस्थापनातील उत्कृष्टतेमुळे हा मान मिळाला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या तपासणीत जन आहार उपहारगृहात स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन, अन्नपदार्थांची अयोग्य हाताळणी आणि कचरा व्यवस्थापनात त्रुटी आढळून आल्या. या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने उपहारगृह तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत संबंधित कंत्राटदारावर एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला. स्वच्छता ऑडिट, तपासणी आणि सेवा गुणवत्तेवर देखरेख अन्न सुरक्षा आणि सेवा मानकांबाबत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आयआरसीटीसीने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जन आहार केंद्रांचे स्वच्छता ऑडिट, नियमित तपासणी आणि सेवा गुणवत्तेवर अधिक कडक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपहारगृह व्यवस्थापनाने सर्व त्रुटी दूर करून आवश्यक सुधारणा केल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. तपासणीत समाधानकारक सुधारणा आढळल्यास ‘जन आहार’ पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

सुधारणा केल्यानंतरच परवानगी

उपहारगृह व्यवस्थापनाला दंड ठोठावण्यात आला असून, त्यांनी सर्व अस्वच्छता दूर करून नियमानुसार सुधारणा करणे बंधनकारक आहे. व्यवस्थापनाने दिलेल्या त्रुटींची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा जागेची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. तपासणीत समाधानकारक सुधारणा आढळून आल्यानंतर जन आहार प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे आयआरसीटीसीचे पश्चिम विभागाचे समुह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.