मुंबई : वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलित लोकलकडे मोठ्या संख्येने प्रवासी वळात आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकलमधील प्रवासी संख्येत १२.९ टक्के वाढ झाली आहे. २६ जानेवारी ते २० मे या कालावधीत तब्बल १.५० कोटी प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला. या आकडेवारीवरून दररोज सरासरी १.३० लाख प्रवाशांनी वातानुकूलित लोकलचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये वातानुकूलित लोकलमधील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२६ मध्ये प्रति लोकलमधून सरासरी १,६६४ प्रवाशांनी प्रवास केला. तर २०२५ मध्ये ही संख्या १,४७४ प्रवासी इतकी होती. म्हणजेच प्रति लोकलमागील प्रवासी संख्येत १२.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रवासी वाढीसोबतच वातानुकूलित लोकल सेवांमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. २६ जानेवारी ते २० मे २०२६ या कालावधीत मध्य रेल्वेने ८,९९१ वातानुकूलित लोकल सेवा चालवल्या. तर २०२५ मध्ये याच कालावधीत ६,८३४ लोकल सेवा चालवण्यात आल्या होत्या. म्हणजेच सेवांमध्ये ३१.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
दैनंदिन प्रवासी संख्येतही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२५ मध्ये दररोज सरासरी ८७ हजार ५९६ प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करत होते. तर २०२६ मध्ये ही संख्या वाढून १ लाख ३० हजार ०७५ वर पोहोचली. ही वाढ तब्बल ४८.५ टक्के असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. याच कालावधीत वातानुकूलित लोकलमधून मिळणाऱ्या महसुलातही वाढ झाली आहे. २०२५ मध्ये एकूण महसूल ४४.२७ कोटी रुपये होता. तो २०२६ मध्ये वाढून ६४.४० कोटी रुपयांवर पोहोचला. दैनंदिन महसुलही ३८.५० लाख रुपयांवरून ५६ लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.
दरम्यान, मे २०२५ मध्ये सीएसएमटी – कल्याण / बदलापूर / टिटवाळा मुख्य मार्गावर अतिरिक्त वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. तसेच २६ जानेवारी २०२६ पासून सीएसएमटी-पनवेल मार्गावरही वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. परिणामी, वातानुकूलित लोकलची संख्या
९४ वर पोहोचली आहे. त्यानंतर मे २०२६ मध्ये आणखी १४ सेवा सुरू झाल्याने मध्य रेल्वेवरील एकूण वातानुकूलित लोकल सेवांची संख्या आता १०८ वर पोहोचली आहे. मार्च आणि मे महिन्यात वातानुकूलित लोकलमधील प्रवासी संख्या सर्वाधिक असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांकडून वातानुकूलित लोकलला वाढती पसंती मिळत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
प्रवाशांना अधिक आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न असून, प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन निर्धारित डब्यांतूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
