मुंबई :लोकलच्या डब्यावर चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला ओव्हरहेड वायरचा (ओएचई) धक्का बसल्याने घाटकोपर स्थानकात मंगळवारी सायंकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सुरक्षेच्या कारणास्तव ओएचईचा वीजपुरवठा बंद केल्याने डाऊन जलद मार्गावरील लोकलसह मेल-एक्स्प्रेसची वाहतूक काही काळ ठप्प झाली. सायंकाळी कार्यालयातून परतण्याच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे कुर्ला, दादर आणि घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. या घटनेमुळे टिटवाळा लोकल १९ मिनिटे खोळंबली, तर काही लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावल्या.

सायंकाळी ५.५६ सीएसएमटी-टिटवाळा जलद लोकल सायंकाळी ६.३३ वाजता घाटकोपर स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर आली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने लोकलच्या डब्यावर चढण्याचा प्रयत्न केला. डब्यावर चढताना तो ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने त्याला विजेचा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच, मध्य रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने विद्याविहार ते कांजूरमार्ग दरम्यान डाऊन जलद मार्गावरील ओएचईचा वीजपुरवठा बंद केला. सायंकाळी ६.३८ ते ६.४७ या कालावधीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. रेल्वे पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी संबंधित व्यक्तीला डब्यावरून खाली उतरवून उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

वीजपुरवठा बंद असल्याने डाऊन जलद मार्गावरील लोकल आणि मेल-एक्स्प्रेस जागीच खोळंबल्या. सुरक्षेची खात्री केल्यानंतर ६.४७ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि रेल्वे वाहतूक सुरू झाली. मात्र, या काळात खोळंबलेल्या गाड्यांमुळे पुढील सेवांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला.

टिटवाळा लोकल १९ मिनिटे खोळंबली

घाटकोपर स्थानकात ६.३३ वाजता थांबलेली सीएसएमटी-टिटवाळा जलद लोकल वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर ६.५२ वाजता रवाना झाली. त्यामुळे या लोकलला १९ मिनिटांचा विलंब झाला. याशिवाय डाऊन जलद मार्गावरील अन्य लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंबाचा सामना करावा लागला.

गर्दीच्या वेळेत प्रवाशांची कोंडी

घटना सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत घडल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. लोकल उशिराने धावू लागल्याने घाटकोपर, कुर्ला आणि दादर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. फलाटांवर प्रवाशांची संख्या वाढल्याने लोकलमध्ये चढणेही प्रवाशांसाठी आव्हानात्मक झाले होते.

रात्रीपर्यंत वेळापत्रकावर परिणाम

ओएचईचा वीजपुरवठा केवळ नऊ मिनिटे बंद ठेवण्यात आला असला, तरी या कालावधीत खोळंबलेल्या गाड्यांमुळे पुढील सेवांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे रात्रीपर्यंत काही लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. रेल्वे प्रशासनाने वीजपुरवठा पूर्ववत करून वाहतूक सुरू केली असली, तरी सेवा सुरळीत होण्यास काही वेळ लागला.