मुंबई : मध्य रेल्वेवरील मुलुंड स्थानकात उभ्या असलेल्या वातानुकूलित लोकलच्या एका डब्याखालून आगीच्या ठिणग्या आणि धूर येत असल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या घटनेची ध्वनिचित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा प्रकार ब्रेक बाइंडिंगमुळे घडल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. त्यामुळे या लोकलची चाके रेल्वे रूळावरून व्यवस्थित धावू शकत नव्हती. परिणामी, वातानुकूलित लोकल बराच काळ एकाच ठिकाणी थांबवून दुरूस्ती करून पुढे मार्गस्थ करण्यात आली.

मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलची सेवा असुविधाजनक असल्याने, प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. जादा पैसे मोजल्यानंतरही योग्य सेवा मिळत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. नुकताच वातानुकूलित लोकलमध्ये वातानुकूलन व्यवस्था बंद पडल्याने अनेक प्रवासी गुदमरले.

तीन प्रवाशांना श्वास घेणे असह्य झाल्याने ते बेशुद्ध पडले होते. वातानुकूलित लोकलमुळे वक्तशीरपणावर परिणाम झाला आहे. तर, मुलुंड स्थानकादरम्यान शुक्रवारी उभ्या असलेल्या वातानुकूलित लोकलच्या खालून आगीच्या ठिणग्या आणि धूर येत असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट तपासणीसांनी घटनेची माहिती घेतली.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, डब्याच्या ब्रेकमध्ये बाइंडिंग झाल्याने घर्षण निर्माण झाले. त्यामुळे डब्याखालून आगीच्या ठिणग्या आणि धूर येवू लागला. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित डबा आयसोलेट केला. त्यानंतर प्रवाशांना उद्घोषणा प्रणालीद्वारे माहिती देण्यात आली. आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकल मार्गस्थ झाली. या घटनेत कोणतीही हानी अथवा प्रवाशाला दुखापत झाली नाही.

या प्रकाराची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून ब्रेक बाइंडिंगचे कारण शोधण्यात येत आहे. दरम्यान, समाज माध्यमावर वातानुकूलित लोकलला आग लागल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात आग लागली नसून ब्रेक बाइंडिंगमुळे धूर आणि आगीच्या ठिणग्या निर्माण झाल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.