मुंबई : ट्ववेन्टी – २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतने इंग्लंडवर सात धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. जेतेपद राखण्यासाठी भारताचा अंतिम सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मुंबईतील पर्यटक, क्रीडाप्रेमींना सामना पाहण्यासाठी जाता यावे म्हणून पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.

पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. तर, दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. वानखेडेवर गुरुवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने २० षटकांत ७ बाद २५३ धावा केल्या. तर, इंग्लंडला २० षटकांत ७ बाद २४६ धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा विजय झाला. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये क्रीडाप्रेमींची गर्दी होणार आहे. गतविजेता म्हणून भारत सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. तर, टी-२० विश्वचषकाच्या जेतेपद मिळविण्यासाठी न्यूझीलंड जोरदार प्रयत्न करणार आहे.

गाडी क्रमांक ०९०२७ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद अतिजलद तेजस एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवरून ७ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि अहमदाबाद येथे सकाळी ८.३० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०९२८ अहमदाबाद – मुंबई सेंट्रल अतिजलद तेजस एक्स्प्रेस ९ मार्च रोजी रात्री ३ वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे सकाळी ११.१५ वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला प्रथम वातानुकूलित, द्वितीय वातानुकूलित आणि तृतीय वातानुकूलित डबे असतील. या रेल्वेगाडीला बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा येथे थांबा देण्यात येईल.

गाडी क्रमांक ०९०२१ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद वातानुकूलित अतिजलद एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल येथून ८ मार्च रोजी सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि दुपारी १२.४० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०९०२२ अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वातानुकूलित अतिजलद एक्स्प्रेस अहमदाबाद येथून ८ मार्च रोजी दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे रात्री ९.४५ वाजता पोहचेल. या रेल्वेगाडीला विस्टाडोम, एक्झिक्युटिव्ह अनुभुती डबा, एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि चेअर कार डबे असतील. या रेल्वेगाडीला बोरिवली, वापी, सुरत, भरूच आणि वडोदरा येथे थांबा देण्यात येईल. या चारही रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.