मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाल्याबरोबर दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा भाग कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. वाळकेश्वर येथील एका उपकरप्राप्त इमारतीचा छज्जा मंगळवारी कोसळला, त्यात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच बुधवारी मध्यरात्री वरळी येथील एका उपकरप्राप्त इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या इमारतींचा भाग कोसळत आहे. त्यामुळे दुरुस्ती मंडळाच्या पावसाळ्यापूर्व इमारतींच्या सर्वेक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाळकेश्वर दुर्घटनेप्रकरणी म्हाडा अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत आहे.
दक्षिण मुंबईत १३ हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्या सर्व इमारती धोकादायक आहेत. पावसाळ्यात इमारती कोसळून जीवितहानी होत असल्याने मागील काही वर्षांपासून दुरुस्ती मंडळाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाच्या आधारे जीर्ण, दुरुस्तीच्या पलीकडे गेलेल्या अतिधोकादायक इमारतींची यादी घोषित केली जाते. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडली तरी जीवितहानी होऊ नये यासाठी या इमारतीतील रहिवाशांना पावसाळापूर्वी संक्रमण शिबिरात हलविले जाते. या प्रक्रियेनुसार दरवर्षी दुरुस्ती मंडळाकडून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. मात्र अनेकदा या यादीत नसलेल्या इमारती कोसळण्याच्या वा इमारतीचा भाग कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
वाळकेश्वरमधील अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या एका उपकरप्राप्त इमारतीचा छज्जा मंगळवारी कोसळला. यात संतोष बारस्कर (५१) यांचा मृत्यू झाला. तर बुधवारी मध्यरात्री वरळीतील मनोज मंदिर या उपकरप्राप्त इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाळकेश्वर आणि वरळीतील इमारती या म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नाहीत. असे असताना पावसात या इमारतींचा भाग कोसळल्याने आता रहिवाशांनी, पागडी एकता संघाने म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
आतापर्यंत उपकरप्राप्त इमारती कोसळण्याच्या जितक्या घटना घडल्या आहेत, त्यातील बहुतांश इमारती या अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील नाहीत. वाळकेश्वर आणि वरळीतील दुर्घटनेतील इमारतीही अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नाहीत. त्यामुळे म्हाडाच्या पावसाळ्यापूर्व सर्वेक्षणाबाबत साशंकता आहे. वाळकेश्वरमधील मृत्यूला म्हाडाही जबाबदार असून त्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी पागडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शहा-पेंडेसे यांनी केली.
अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या इमारतींचे भाग कोसळत असल्याने म्हाडाने सर्व इमारतींची संरचनात्मक तपासणी करावी आणि अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला चालना द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. याविषयी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी वरळीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून जिन्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले. तर वाळकेश्वरमधील इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सांगून मंडळाने हात वर केले आहेत.
२१२० रहिवासी धोक्यात
अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या इमारतींचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडत असताना दुसरीकडे ८२ अतिधोकादायक इमारतींतील २१२० रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मंडळाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत यंदा ८२ इमारतींचा समावेश असून या इमारतींतील २१२० रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी, संक्रमण शिबिरात हलविणे अपेक्षित होते. मात्र जुलै महिना सुरू झाला तरी या रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात आलेले नाही. रहिवाशांना नोटिसा पाठवल्या जात आहेत, वीज-पाणी सेवा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या इमारतींबाबत कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
