मुंबई : चांदिवली विधानसभा निवडणूक वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने मतदानयंत्र (ईव्हीएम) तपासण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान यांनी या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला होता. त्यानंतर खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन ईव्हीएम तपासण्याचे आदेश देण्याचीही मागणी केली होती. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या एकलपीठाने खान यांच्या दाव्याची दखल घेऊन ईव्हीएम तपासणीचे आदेश दिले.
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या उप-निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नसीम खान यांना पाठवलेल्या पत्रानुसार, बंगळुरूस्थित ‘भारतइलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या ईव्हीएम उत्पादक कंपनीमार्फत १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबईत केवळ ‘निदान चाचणी’ करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यानुसार, खान यांनी ईव्हीएम तपासणीच्या आदेशाची मागणी केली होती.
