मुंबई : चर्चगेट येथील प्रसिद्ध मेसर्स के. रुस्तम या आईस्क्रीम कंपनीवर मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने छापा मारला. त्यावेळी या कंपनीमध्ये मुदत संपलेली उत्पादने आणि जिवंत उंदीर व माशांचा वावर आढळून आला. परिणामी, रुस्तम आईस्क्रीम कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला. यामुळे रुस्तमच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत मंगळवारी चर्चगेट येथील वीर नरिमन रोडवरील ब्रेबॉर्न स्टेडियम हाऊसमधील प्रसिद्ध मेसर्स के. रुस्तम अँड कंपनी या आईस्क्रीम विक्रेत्यांवर छापा घातला. यावेळी केलेल्या तपासणीमध्ये आस्थापनांमध्ये स्वच्छते संदर्भातील बाबींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.

या आस्थापनांमध्ये जिवंत उंदीर आणि माशांचा वावर आढळून आला. त्याचप्रमाणे कंपनीमधील कोल्ड चेन ऑपरेशन्स खंडित झालेली होती. तसेच, रेकॉर्ड न ठेवणे यासारख्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. तसेच, मुदत संपलेली उत्पादनेही आढळून आली. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम ३२(३) अंतर्गत रुस्तम आईस्क्रीम कंपनीचा परवाना तात्काळ रद्द केला.

मरीन ड्राइव्हपासून जवळ असलेल्या के. रुस्तम पार्लरची स्थापना १९५३ मध्ये झाली आहे. या आईस्क्रीम पार्लरला ७३ वर्ष झाली आहेत. रुस्तम आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मरीन ड्राईव्हला येणाऱ्या पर्यटकांसाठी हे पार्लर सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला काच आणि चीनी मातीच्या प्लेटमध्ये हे आईस्क्रीम दिले जात असे. परंतु, काच आणि मातीच्या प्लेट काळाच्या ओघात मागे पडल्यावर या कंपनीने सुरू केलेले आइस्क्रीम बिस्कीट हे सर्वांच्या पसंतीला उतरले. हे आइस्क्रीम बिस्कीट खाण्यासाठी नागरिक आवर्जून येथे येतात.