मुंबई : मे महिन्यातील विक्रमी पावसानंतर जूनचा पहिला पंधरवडा मुंबईसाठी तुलनेत कोरडाच गेला. सध्या जूनमध्ये पावसाची तूट नोंदवली जात असून, दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर वाढून ही तूट भरून निघून मासिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता खासगी हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
मुंबईत यंदा १५ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दाखल झाला. सामान्यत: मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होतो. मात्र यंदा मुंबईत २६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल झाला. त्यानंतर जूनच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. काही वेळा अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. मात्र, मागील १५ दिवसांत जोरदार पाऊस झालेला नाही. त्यानंतर दोन दिवस म्हणजेच रविवार आणि सोमवारी मुंबईत पावसाने जोर धरला होता. मंगळवारी दिसभर ढगाळ वातावरण होते, तरी फारसा पाऊस पडला नाही.
दरम्यान, सध्या मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. तेसच सोमाली जेट प्रणालीमुळे पुढील दोन आठवडे मुंबईत सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे खासगी हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले. या दोन आठवड्यात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जूनच्या पावसाची सरासरी ओलांडली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईत यंदा मे महिन्यात जूनच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पावसाने सर्वसामान्य हवामान पद्धतींच्या अनुमानांना छेद देत मे महिन्यातच जोरदार हजेरी लावली. मुंबईत १ ते २७ मे या कालावधीत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे.
सामान्यत: जूनमध्ये मोसमी पाऊस दाखल होतो आणि पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार सुरुवातीपासूनच मुंबईत हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. काही वेळा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता.