मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून प्रथमच मिळकतीचे फेरफार ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना याचा लाभ होणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत याबाबतचे निवदेन करताना बावनकुळे म्हणाले की, मुंबई शहर व उर्वरित महाराष्ट्रातील मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) संगणकीकरणाच्या प्रणाली वेगवेगळ्या असल्यामुळे आतापर्यंत मुंबईत ऑनलाईन फेरफार प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने या प्रक्रियेला गती दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग व ४ नगर रचना योजनांमधील सुमारे २७ हजार८४७ मिळकती पत्रिका mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी विशेष ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या फेरफारसाठी अर्ज करता येणार आहेत. अर्जाची स्थितीही ऑनलाईन तपासता येणार असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यात प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये खरेदीखत, वारसा, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना होणार असल्याचे सांगून मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे हा उपक्रम राबविल्याबद्दल बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.