मुंबई : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २५० रुपये, कचरा टाकल्यास ५०० रुपये, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास २०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका यासाठी प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला जात होता. मात्र, आता दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

महानगरपालिकेकडून घनकचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधि – २०२५ प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुसार रस्ते, पदपथ, बाग, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड भरावा लागेल. यात काही नव्या तरतुदीदेखील समाविष्ट करण्यात आल्या असून, त्यात बांधकाम व पाडकाम कचरा अनधिकृतपणे टाकणे (२०,००० रुपये ), विनापरवाना राडारोडा वाहतूक (२५,००० रुपये), तसेच व्यावसायिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणात कचरा जाळणे (१०,००० रुपये) आदी बाबींचा समावेश आहे. यापूर्वी अशा प्रकारांसाठी दंडाची कोणतीही स्पष्ट तरतूद नव्हती.

सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याप्रकरणी पूर्वी १०० रुपये दंड आकारला जात होता. तो आता १००० रुपये एवढा करण्यात आला आहे. तसेच फेरीवाल्यांकडे कचरापेटी नसल्यास किंवा कचरा वर्गीकरण न केल्यास त्यांच्याकडून ७५० रुपये दंड आकारला जाणार आहे.

त्याचबरोबर खुल्या आणि सार्वजनिक जागांवर अंघोळ व शौच केल्यास पूर्वी १००, तर आता ३०० व ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. शिवाय, मोकळ्या जागी व सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना खाद्य देणे (रु.५००) दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी भांडी, कपडे, इतर कोणत्याही वस्तू धुणे ३०० रुपये (पूर्वी १००), वाहन ५०० रुपये (पूर्वी १०००), अंगण स्वच्छ न ठेवणे (एकाच जागेच्या मालकांसाठी, रहिवाशांसाठी (रु. ५०० आणि इतरांसाठी रु.१५००) दंड आकारला जाईल.