बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी प्रचार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारीच आदित्य यांनी पाटण्यात तेजस्वी यादव यांच्याबरोबरच मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतल्यानंतर आता तेजस्वी यादव मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने प्रचार करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सध्या ठाकरे गट मोर्चेबांधणी करत आहे. आदित्य आणि तेजस्वी यांची भेट ही प्रामुख्याने मुंबईच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यंदा अधिक कठीण जाईल असा अंदाज पूर्वीपासूनच व्यक्त केला जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक ठरणार आहे. असं असताना मूळचे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येऊन मुंबईत स्थायिक झालेले मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबईमध्ये या दोन्ही हिंदी भाषिक राज्यांमधील ५० लाख मतदार असल्याचं सांगितलं जातं. ही ५० लाख मतं या निवडणुकीमध्ये फारच निर्णायक ठरणार आहेत.

‘इंडिया टुडे’ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आदित्य आणि तेजस्वी यांच्या भेटीमागील मुख्य कारण हे मुंबई महानगरपालिका निवडणूक हेच होतं. या भेटीदरम्यान आदित्य ठाकरेंनी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे तरुण नेतृत्व अशी ओळख असलेल्या तेजस्वी यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रचारासाठी मुंबईत यावं अशी गळ आदित्य यांनी उपमुख्यमंत्र्यांना घातल्याचं समजतं.

तेजस्वी यांच्या या भेटीनंतर आदित्य यांनी हिंदी भाषिकांच्या मुद्द्यावरुनच भाष्य केलं. “हिंदी भाषिक उत्तर भारतीयांविरोधात जे आक्रमक भूमिका घेतात, त्यांच्याशीच आता भाजपाची जवळीक आहे” असा आरोप आदित्य यांनी केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात शांततेत सर्वजण एकत्र राहात होते असे त्यांनी नमूद करत विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं.

प्रकल्प आधी गुजरातला हलविले आणि आता प्रचारासाठी राज्याचे मंत्रिमंडळ तेथे गेले आहे. राज्यात अनेक गंभीर प्रश्न असताना राज्य सरकारला निवडणूक प्रचारासाठी वेळ आहे, मात्र मंत्रिमंडळ बैठकीसाठी एक तासही वेळ काढू शकत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आल्याने राज्य सरकारवर टीका केली. निवडणूक प्रचार करणे, ठीक आहे, पण राज्यातील जनतेसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व मंत्र्यांनी एखादा तास तरी वेळ द्यायला हवा होता, असे ठाकरे यांनी नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai civic body poll bihar deputy cm tejashwi yadav likely to campaign for uddhav sena scsg
First published on: 25-11-2022 at 08:58 IST