मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २२७ प्रभागांमध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारांनी बाईक रॅली, प्रचार फेरी, रॅली काढून संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यावर भर दिला. शेवटच्या दिवशी अटीतटीच्या लढतीतील उमेदवारांचा भर स्वत:च्या प्रचारापेक्षा विरोधकांच्या अपप्रचारावर होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी गेल्या आठ दहा दिवसांपासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी थांबली. शेवटच्या दिवसाचा पूर्ण फायदा उमेदवारांनी करून घेतला. आजच्या दिवशी संपूर्ण मंबईत प्रचार रॅली, बाईक रॅली यावर अधिक भर होता. वाहनांवरील प्रचार रॅलीतून संपूर्ण प्रभागात शेवटचा प्रचार करण्याकडे उमेदवारांचा कल होता.
आपले चिन्ह, आपल्या उमेदवाराचे नाव मतदारांच्या मनावर ठसवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील होते. त्याचवेळी प्रचाराची अधिकृत मुदत संपल्यानंतर होणारा छुपा प्रचार, खासगी भेटीगाठी यांचेही नियोजन उमेदवारांच्या कार्यालयांमध्ये सुरू होते. त्याचवेळी रात्र वैऱ्याची आहे, आपल्याला परिवर्तन हवे अशा स्वरुपाचे आवाहन ध्वनीक्षेपकांवरून करण्यात येत होते.
शिवडी हा ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असून या प्रभागात कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. या रॅलीमध्ये अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे, आई शर्मिला ठाकरे या देखील सहभागी झाल्या होत्या. सायन कोळीवाडामध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवार प्रणिता वाघधरे यांनीही बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
शिवडीतच शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार अनिल कोकीळ यांनीही प्रचार रॅली काढली होती. दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकर यांनी रॅलीतून प्रचार केला. यावेळी त्यांनी आपल्या मुलांसह रॅलीत सहभाग घेतला व शक्तीप्रदर्शन केले. तेजस्वी यांच्यासमोर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या धनश्री कोलगे उभ्या असून त्यांच्या प्रचारासाठी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी चौक सभा घेतली. तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवार वंदना गवळी यांनी प्रचार रथातून संपूर्ण प्रभागात फिरून प्रचार केला.
समाजमाध्यमांवरूनही प्रचार
समाजमाध्यमांवरूनही प्रचारासाठी हा शेवटचा दिवस असून उमेदवारांनी समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर चित्रफिती प्रसारित करून आवाहन केले. मुंबई वाचवायचीय तयारीला लागा, असे आवाहन महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या कार्यकर्त्यांकडून केले जात होते. उमेदवारांच्या आवाजात मत देण्याचे आवाहन करणाऱ्या कॉल्समुळे मतदारांचे फोन सतत खणखणत होते.
घोषणा, प्रचार अप्रचार
शेवटच्या दिवशीच्या या प्रचारामध्ये घोषणांचा पाऊस पडत होता. येऊन येऊन येणार कोण, घासून नाय ठासून येणार, आंब्याच्या वनात मक्याची कणसं…आम्ही नाय आणली भाड्याची माणसं अशा घोषणा दिल्या जात होत्या. तर शिवसेना शिंदे पक्षाकडून लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली मते मागितली जात होती. परिवर्तन हवे अशी साद घातली जात होती. तर शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युतीच्या कार्यकर्त्यांकडून रात्र वैऱ्याची आहे…मराठी माणसा जागा राहा असे आवाहन केले जात होते.
उमेदवारांच्या दुचाकी रॅलीमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी
प्रचाराचा शेवटचा दिवस सार्थकी लावण्यासाठी अनेक ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रॅली काढण्यात आल्या. त्यात मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाने सहभाग घेतला होता. काही उमेदवारांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या काही कलाकारांना देखील त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी करून घेल्याने त्यांना पाहण्यासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. परिणामी पूर्व उपनगरातील अनेक रस्ते मंगळवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडीत अडकले होते. त्याचा मोठा मनस्ताप शाळेतील विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागला होता. अखेर सायंकाळी पाच वाजता या प्रचार रॅलीची सांगता झाल्यानंतर मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
