मुंबई : देशाचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शनिवारी शासकीय विधि महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी, उपस्थितांना मराठीतून संबोधित करू की इंग्रजीतून याबाबत आपण थोडे गोंधळलेलो असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. त्यावर उपस्थितांमधून मराठीतून बोला सांगण्यात आल्यानंतर मराठीतून बोलू ? सगळ्यांना समजेल का ? असा प्रश्न गवई यांनी केला. तसेच, ठीक आहे महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे, ते पाहता मी मराठीतूनच बोलतो, असे म्हणत भाषणाला सुरूवात केली. सरन्यायाधीशांच्या या मिश्किल टिप्पणीवर सभागृहात हशा पिकला.
गेल्या १४ मे रोजी न्यायमूर्ती गवई यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. गवई हे शासकीय विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने आणि त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने महाविद्यालयाने सत्कार समारंभ आयोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शासकीय महाविद्यालयात शिकवण्याला सुरूवात केल्याला ९० वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी मराठीतून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. तोच धागा पकडून आपण कार्यक्रमाला मराठीतून संबोधित करावे की इंग्रजीतून हा प्रश्न गवई यांनी उपस्थितांना विचारला. कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे आजी-माजी न्यायमूर्ती, या विधि महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले प्रतिथयश न्यायमूर्ती, वकील आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. त्यामुळे, सरन्यायाधीशांनी कोणत्या भाषेतून भाषण करू, असा प्रश्न केला. तथापि, उपस्थितांनीच मराठीतून बोलण्याचा आग्रह सरन्यायाधीशांना केल्याने त्यांनी संपूर्ण भाषण मराठीतून केले.
शासकीय विधि महाविद्यालयाचे विधि क्षेत्रातील महत्त्व सरन्यायाधीश गवई यांनी यावेळी विशद केले. या महाविद्यालयाने आपल्यासह देशाला सहा ते सात सरन्यायाधीश दिले. देशाचे पहिले सरन्यायाधीश ए. जे. कार्निया हेही याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. या महाविद्यालयातून कायद्याच्या शिक्षणाचे बाळकडू मिळालेल्या अनेकांनी विधि क्षेत्रात भरीव कामगिरी केली. आपणही याच महाविद्यालयाचे विद्यार्थी असून आपल्याला देशाचे सरन्यायाधीश म्हणून कार्य करण्याची संधी मिळते याचा अभिमान आहे. पुढील काळातही महाविद्यालयाच्या नावाला साजेसे काम करू, असे आश्वासन गवई यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेले मानपत्र, त्यांच्यावर लिहिलेली कविता आणि त्यांचे रेखाटलेले रेखाचित्र यानेही सरन्यायाधीश भारावून गेले.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर यावेळी सरन्यायाधीशांनी प्रकाश टाकला. डॉ. आंबेडकर यांनी विधि शासकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सुरूवात केली. त्याचवेळी, त्या काळी परदेशात जाऊन विविध विषयांतील शिक्षण घेतले. यशाचे शिखर कसे गाठायचे याचे डॉ. आंबेडकर हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे नमूद करताना त्यांनी देशाच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात क्रांती करण्याच्या दृष्टीने घटना लिहिल्याचेही सरन्यायाधीश म्हणाले. यावर्षी २६ जानेवारी रोजी राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. राज्यघटनेच्या या अमतृतमहोत्सवी वर्षात आपल्याला देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळते हे मी माझे भाग्य समजतो, अशी भावना गवई यांनी व्यक्त केली.
आंबावडे येथील न्यायालयीन इमारत लवकरच पूर्ण
डॉ. आंबेडकर यांचा संबंध आलेल्या ठिकाणी जाण्याचे भाग्य आपल्याला लाभले. मंडणगढ तालुक्यातील आंबावडे येथील न्यायालयाची इमारत धोकादायक स्थितीत होती. गेल्या वर्षी आपण या इमारतीला भेट दिली. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरात ही इमारत नव्या साजात उभी राहील, असे आश्वासन दिले होते. ही इमारत पुढील दोन महिन्यांत तयार होईल आणि आपल्याच हस्ते तिचे उद्धाटन होईल ही अभिमानाची बाब असल्याचेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.