Mumbai Climate Week 2026: मुंबईत हवामान बदल, संवादातून कृतीकडे! या जागतिक हवामान विषयक संवादाचे (क्लायमेट वीक) आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे येथे आज (१७ फेब्रुवारी) या संवादाचे उद्धाटन झाले. ‘हवामान बदलासंबधित संवादासाठी मुंबईपेक्षा दुसरे योग्य शहर नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
‘क्लायमेट वीक’चे उद्धाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उद्धाटन झाले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
हवामान बदल संवादाचे महत्व
“मुंबईत मुसळधार पाऊस होतो तेव्हा, ट्रेन थांबतात, घरांमध्ये पाणी शिरते, व्यवसायांवर परिणाम होतो, जनजीवन विस्कळीत होते. उष्णतेचा पारा वाढतो तेव्हा तो फक्त वर जाणारा उष्णतेचा आलेख नसतो तर, बांधकाम कामगार, फेरीवाले आणि शेतकरी सहन करत असलेला त्रास आणि कष्टही असतात. हाताशी आलेल्या पिकांवर जेव्हा अवकाळी कोसळतो तेव्हा शेतकऱ्यांना प्रचंड वेदना आणि दु:ख सहन करावे लागते”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
“मुंबई देशाचे आर्थिक राजधानी आहे. अशात येथील हवामान बदलामुळे निर्माण होणारी आव्हानं प्रशासनासमोर देखील एक आव्हान म्हणून उभी आहेत. त्यामुळे हवामान बदलावर होणार संवाद महत्वाचा आहे”, असे फडणवीस यांनी नमूद केले.
महाराष्ट्र देशाचे औद्योगिक हब
“हवामानशी निगडीत जबाबदारी आणि आर्थिक प्रगती एकत्र पुढे जाऊ शकतात हे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने दाखवून दिले आहे. भारताच्या ५५० गिगावॅट अक्षय उर्जा क्षमतेत अतिरिक्त ५५ गिगावॅट वाढ गेल्या एक वर्षात झाली आहे. यातील सर्वाधित स्त्रोत महाराष्ट्रातील आहेत”, असे फडणवीस यांनी भाषणात सांगितले.
‘हायड्रोजन, इलेक्ट्रीक वाहने, बायोइंधन यांचा वापर वाढवला जात आहे. महाराष्ट्र देशाचे औद्योगिक हब आहे. महाराष्ट्रातील बदल देशातील बदलांना चालना देतात आणि भारतातील बदल जगाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे ठरतात’, असे फडणवीस म्हणाले.
पर्यावरणपूरक गोष्टींवर भर
अक्षय उर्जा क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर (सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहने आणि मालवाहतूक) यात आम्ही गुंतवणूक वाढवत आहोत. पण, हवामान बदल हा केवळ शहरापुरता मर्यादीत विषय नाही. शेतकऱ्यांना पावसाच्या अनिश्चितेचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे होणारा बदल संधी निर्माण करणारा हवा आणि संधी निर्माण झाल्या त्यांचा येणाऱ्या पिढ्यांना लाभ व्हायला हवा, असेही फडणवीस म्हणाले.
