मुंबई : हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा मंच उभारला जाणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या क्लायमेट वीकच्या माध्यमातून विविध देशांचे प्रमुख नेते, उद्योग क्षेत्रातील प्रमुख, हवामान तज्ज्ञ, विविध संस्था, युवक आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येणार आहेत.

‘प्रोजेक्ट मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, ‘एमएमआरडीए’ आणि मुंबई महापालिका सहकार्य करणार आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे या क्लायमेट वीकचे मुख्य केंद्र (हब) उभारण्यात येणार आहे. शहरातील महाविद्यालये, विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांची ‘हब-अँड-स्पोक’ पद्धतीने आखणी करण्यात आली आहे.

हवामानाशी निगडित प्रत्यक्ष उपाययोजना प्रदर्शित व विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे आयोजक प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी दिली.

मुंबई क्लायमेट वीकच्या मुख्य हबमध्ये नेतृत्व संवाद, विविध परिसंवाद, इनोव्हेशन चॅलेंज, युवक हरित नवकल्पना स्पर्धा आणि उपाययोजना प्रदर्शन भरवले जाणार आहे. पहिल्या दिवशी प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतील अर्थशॉट प्राईज सादरीकरणाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. निसर्ग, अन्नप्रणाली व लोक केंद्रित उपायांवर भर असेल. या उपक्रमात अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला विद्यार्थ्यांशी संवाद साधून विज्ञान, अवकाश आणि हवामान जबाबदारी यावर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाची मांडणी अन्नप्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी शाश्वतता या तीन स्तंभांवर आधारित आहे. नवकल्पनांना चालना देण्यासाठी ‘एनएसई’च्या सहकार्याने इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात आले असून, अंतिम फेरीत निवडलेल्या कल्पनांना धोरणकर्ते व गुंतवणूकदारांसमोर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

हिलरी क्लिंटन, बिल गेट्स यांची उपस्थितीत

जागतिक स्तरावरील हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, राजीव शाह (रॉकफेलर फाउंडेशन), आयएफसीचे इमाद फखुरी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, या सारखे आंतरराष्ट्रीय मान्यवर या उपक्रमात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री पियूष गोयल यांसह विविध राज्यांचे नेते. उद्योग व वित्त क्षेत्रातून जमशेद गोदरेज, नादिर गोदरेज, अमित चंद्रा, व्ही. वैद्यनाथन. स्वयंसेवी संस्था व संशोधन क्षेत्रातून रोहिणी निलेकणी, सौम्या स्वामीनाथन, मृदुला रमेश आणि पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर या उपक्रमात सहभागी होणार आहेत.