शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मुंबई नागरी संस्थेचा प्रकल्प म्हणजे मुंबई कोस्टल रोड ४० टक्के पूर्ण झाला आहे आणि 2023 च्या अखेरीस कोट्यवधी रुपयांचा हा प्रकल्प प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे, असं मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.
चहल यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पूर्ण केलेल्या कामामध्ये ४० व्यासाच्या देशाच्या पहिल्या समुद्राखालील बोगद्याच्या एक किलोमीटर भागाचा समावेश आहे.“बोगद्याची केवळ ९०० मीटर लांबी आता शिल्लक आहे. आपल्या देशात ४० फूट व्यासाचा हा समुद्राखालील पहिला बोगदा आहे. ”चहल म्हणाले. “तीन पाळ्यांमध्ये २४ तास काम चालू आहे आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रकल्प पूर्ण होईल.”

द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, १०.५८ किलोमीटरचा कोस्टल रोड, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प, दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हपासून वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरच्या टोकापर्यंतचा मार्ग असेल. वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रोजेक्ट चालू असताना-महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यावर देखरेख करत आहे. कोस्टल रोड दक्षिण मुंबईपासून दाटीवाटीच्या पश्चिम उपनगरांपर्यंत अखंड संपर्क प्रदान करेल. प्रकल्पाची किंमत १२ हजार ७२१कोटी रुपये आहे.

कोस्टल रोड मूळतः २०११ मध्ये २९.२ किलोमीटर लांब दक्षिण-उत्तर भाग म्हणून मरीन ड्राईव्ह ते कांदिवली, वर्सोवा पलीकडे सुदूर पश्चिम उपनगर म्हणून आखण्यात आला होता. राज्य सरकार आता वर्सोवा ते विरार पर्यंत आणखी एक सागरी सेतू बांधण्याच्या विचारात आहे. या प्रकल्पामध्ये किनारपट्टी रस्त्यालगतच्या पुनर्प्राप्त जमिनीवर १२५ एकरचे हिरवे क्षेत्र आणि १,८५२ भूमिगत कार पार्किंगच्या जागा देखील समाविष्ट असतील, असे चहल म्हणाले. कोस्टल रोडचा भाग म्हणून, बीएमसी एकूण २७ किलोमीटरचे रस्ते बांधत आहे, त्यापैकी १६ किलोमीटर इंटरचेंज आहेत.