मुंबई : सामान्य मुंबईकरांच्या करातून बांधण्यात आलेल्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारा मार्गा’वर (कोस्टल रोड) अवघ्या दोन बस चालवणे हा सामान्य मुंबईकरांशी दुजाभाव आहे. प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी बांधण्यात आलेल्या किनारा मार्गावर बेस्ट बसची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार रईस शेख यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांना पत्र पाठवले आहे.

मुंबईच्या पश्चिम किनारी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने मुंबई सागरी किनारा मार्ग बांधला. या रस्त्यावर पादचारी, अवजड वाहने, तीन चाकी, दुचाकी यांना बंदी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी सद्यस्थितीत ए ८४ ( डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते ओशिवरा डेपो ) आणि ए ७८ (एनसीपीए ते भायखळा ) या दोन बेस्ट बस सुरू आहेत. या दोन्ही बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून या मार्गावर आणखी बस वाढवण्याची गरज आहे. या प्रकल्पावर पालिका १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च करते आहे. सामान्य मुंबईकरांच्या करामधूनच हा मार्ग बांधण्यात आला आहे.

मात्र या मार्गावर पुरेशा बेस्ट बसची संख्या नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. टॅक्सीचे भाडे परवडत नसतानाही अनेकदा वेळ वाचण्यासाठी प्रवासी टॅक्सीचा वापर करतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा भुर्दंड बसत असल्याने त्यांच्या सोयीसाठी संबंधित मार्गावर अतिरिक्त बसगाड्या सुरू कराव्यात अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे. वेळ वाचवण्यासाठी सागरी किनारा रस्ता बांधला. बेस्ट बसचे या मार्गावरील भाडे १२ ते ५० रुपये असे आहे.

मात्र किनारा मार्गावर बेस्ट बसची संख्या अपुरी असल्यामुळे सामान्य मुंबईकरांना किनारा मार्गासाठी टॅक्सीचा महागडा पर्याय स्वीकारावा लागतो. बेस्टकडे कंत्राटी तत्वावरच्या २५३३ बसगाड्या आहेत. त्यामुळे किनारा मार्गावर बेस्टला आणखी बस चालू करण्यासाठी अडचण नसावी, असे आमदार शेख यांनी आयुक्त आणि महाव्यवस्थापक यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.