मुंबई : सागरी किनारा मार्गावर रविवारी पहाटे साडे पाच वाजता मरीन ड्राइव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बीएमडब्लू मोटारीचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ हा भीषण अपघात झाला.सागरी किनारा मार्गावरील नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगामुळे चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

अपघातानंतर जखमींना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. नायर रुग्णालयातील माहितीनुसार, शानय गज्जल (२१) आणि धिर्या सेठ (१७) यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.

आणखी एका २५ वर्षीय तरुणालाही मृत घोषित करण्यात आले. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. तर २० वर्षीय तरुणाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

सागरी किनारा मार्ग हा विना अडथळा, विना सिग्नल असा मार्ग असल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या अनेकदा वेगमर्यादा ओलांडतात. सागरी किनारा मार्गावर ताशी ६० ते ८० किमी वेगमर्यादा अपेक्षित असून काही वेळ यापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवली जातात व त्यामुळे अपघातही होण्याची शक्यता आहे. तसेच सागरी किनारा मार्गावर रात्रीच्यावेळी कार रेसिंगही सुरू असते. रात्री १० ते १२ नंतर पहाटे पर्यंत अत्यंत श्रीमंतांच्या महागड्या गाड्या, मोठा आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स कार यांची स्पर्धा व त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी वाहतूक पोलिसांकडे व मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे केल्या होत्या.
रात्री १० नंतर या मार्गावर रेसिंग करणाऱ्या श्रीमंत वर्गाच्या गाड्या धावत असतात, असा आरोप येथील नागरिकांनी केला होता.

या परिसरातील रहिवाशांनीही गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांना पत्र लिहिले होते. अशा भरधाव धावणाऱ्या गाड्या
आणि भरधाव गाड्यांच्या स्पर्धा यांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनानेदेखील वाहतूक पोलिसांकडे मदत मागितली होती.

तसेच दिवसाही या मार्गावर गाड्या भरधाव धावतात. त्यामुळे अपघात होतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सागरी किनारा मार्गावर एक अपघात झाला होता. या अपघातात कंत्राटदाराचा एक कर्मचारीही मृत्यूमुखी पडला होता. तर काही महिन्यांपूर्वी या मार्गावर अत्यंत वेगात असलेली एक बीएमडब्ल्यू गाडी दुभाजकावर आदळली होती.

अशा घटनांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने तंत्रज्ञानाबरोबरच पोलिसांचीही मदत घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे ताडदेव वाहतूक हद्दीतील सागरी किनारा मार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच हायवे पोलीस यांच्या स्पीड गन वाहनांच्या मदतीने कारवाई केली जाते.