मुंबई: मुंबई किनारा रस्ता (उत्तर) मार्गरेषेमुळे बाधित होणाऱ्या बोरिवली येथील जोडरस्त्याच्या पश्चिम बाजूकडील ३० बांधकामांचे शुक्रवारी आर उत्तर विभागाच्यावतीने निष्कासन करण्यात आले. या कारवाईमुळे प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, तसेच प्रवाशांना सुलभ व अखंड प्रवासाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईची किनारपट्टी यामुळे एकमेकांना जोडली जाणार आहे.

या प्रकल्पाच्या उभारणीचे काम विविध सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. पॅकेज एफ मध्ये ३.४७ लांबीच्या गोराई आंतरबदल ते दहिसर आंतरबदल (उन्नत मार्ग) विकास कामाचा अंतर्भाव आहे. मुंबई किनारा रस्ता (उत्तर) मार्गरेषेमुळे बोरिवली येथील जोडरस्त्याच्या पश्चिम बाजूकडील ३० बांधकामे बाधित होत आहेत. त्यामुळे परिमंडळ ७ च्या उप आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आर उत्तर विभागाच्यावतीने या बांधकामांचे शुक्रवारी निष्कासन करण्यात आले. महानगरपालिकेचे ५ अभियंते, २० कर्मचारी तसेच २ पोकलेन संयंत्र, २ जेसीबी संयंत्र, ३ डंपर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यावेळी तैनात करण्यात आले होते.