सागरी किनारा मार्गाला आता जुलै २०२३ची मुदत

न्यायालयीन प्रकरणे, टाळेबंदी यांमुळे प्रकल्पाला विलंब

न्यायालयीन प्रकरणे, टाळेबंदी यांमुळे प्रकल्पाला विलंब

मुंबई : महापालिके चा बहुचर्चित प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाचे १७ टक्के  काम पूर्ण झाले असून आतापर्यंत या कामासाठी १२८१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र न्यायालयीन प्रकरणे आणि टाळेबंदी यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत पुढे गेली आहे.

हा प्रकल्प आता जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय पालिके ने ठेवले आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत पालिके तर्फे  सागरी किनारा मार्ग तयार के ला जात आहे. या मार्गाची  लांबी १०.५८ किलोमीटर असणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा प्रकल्प गेल्या वर्षभरात रखडला होता. पाच वर्षांत म्हणजेच २०२२ मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार होते. मात्र जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सात महिने या प्रकल्पाचे काम पूर्ण थांबले होते. तर त्यानंतर टाळेबंदीमुळे हे काम रखडले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या कामाने वेग घेतला आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर समुद्रात भराव टाकू न जमीन तयार के ली जात आहे. त्यापैकी १७५ एकर (७०.८२ हेक्टर) जमीन आतापर्यंत भराव घालून तयार करण्यात आली आहे, तर अजून १०२ एकर (४१.२८ हेक्टर) पर्यंत भराव घालावा लागणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.  सध्या प्रकल्पासाठी भराव टाकणे, पाइलिंग, बोगदा खणणारी मशीन जमिनीखाली उतरवणे, गर्डरची कास्टिंग आदी कामे सुरू आहेत.

वैशिष्टय़े काय?

’  प्रस्तावित किनारी रस्ता प्रकल्पामध्ये ४ + ४ लेन भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत.

’  प्रकल्प तीन पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे.

’  पॅकेज ४ प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शिनी पार्क (४.०५ कि.मी.)

’  पॅकेज १ प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस (३.८२ कि.मी.)

’  पॅकेज २ बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक (२.७१ कि.मी )

’  कोस्टल रोडची एकूण लांबी १०.५८ कि.मी.

’  बोगद्याची लांबी प्रत्येकी २.०७२ कि.मी. आहे.

’  भूमिगत कार पार्कसाठी ४ जागा आरक्षित आहेत.

बोगदा खणण्याचे काम ७ जानेवारीपासून

या प्रकल्पासाठी मलबार हिल टेकडी, गिरगाव चौपाटी खालून समांतर असे दोन सर्वात मोठे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याकरीता खास चीनहून बोगदा खणणारे यंत्र(टीबीएमचा) आणण्यात आले असून ती ४०० मीटर लांब व १२.१९ मीटर (३९.६ फू ट) व्यासची आहे. जो भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठय़ा व्यासाचा टीबीएम आहे. १०० सुटय़ा भागांमध्ये असलेल्या या अवाढव्य यंत्राची जुळवणी पूर्ण झाली असून भराव घातलेल्या जमीनीवर हे यंत्र उभे आहे. या यंत्राचे मावळा असे नामकरण करण्यात आले असून  जमीनीखाली हे यंत्र उतरवल्यानंतर ७ जानेवारीपासून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होणार आहे.

आतापर्यंत दहा टक्के  खर्च

पालिके च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १२,७२१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १२८१ कोटी रुपये नोव्हेंबर २०२० पर्यंत खर्च झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai coastal road construction will be completed by july 2023 zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या