मुंबई : सागरी किनारा मार्गालगतच्या भराव भूमीवर हिरवळ तयार करण्यात येणार असून या हिरवळीचा देखभाल खर्च आता सर्वसामान्यांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे. सुमारे ५३ हेक्टर जागेत हिरवळ तयार करण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशन करणार आहे. मात्र या हिरवळीच्या देखभालीचा खर्च भागवण्यासाठी कंपनीने विविध मनोरंजन, क्रीडा आणि पर्यावरणपूरक सुविधा उभारून त्यात सशुल्क प्रवेश देण्याचे ठरवले आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी पालिकेचा पैसा वाचला असला तरी नागरिकांना मात्र या ठिकाणी येण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

सागरी किनारा मार्ग प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरीसेतूच्या वरळी टोकापर्यंत असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात या मार्गालगत भराव भूमीवर हिरवळ आणि नागरी सुविधा तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेने गेल्यावर्षी कॉर्पोरेट कंपन्यांना आमंत्रित केले होते. या कामासाठी पालिकेने ४०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागवले होते. त्यातून रिलायन्स कंपनीची निवड झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पाचा भार पालिकेवर येऊ नये अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात देखभालीचा खर्च आता नागरिकांकडून वसूल करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

सागरी किनारा मार्गालगत भराव घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये जेव्हा मंजुरी दिली, तेव्हा भरावभूमीवर कोणतेही निवासी किंवा व्यावसायिक विकास करू नये अशी अट घातली होती. मात्र रिलायन्स कंपनीला हिरवळ निर्माण करण्याचे काम दिले, तेव्हा कंपनीने या हिरवळीवर सशुल्क मनोरंजन सुविधा तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यासाठी महापालिकेने कंपनीला याकरीता सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगितले होते. जून २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १५ टक्के जागेतच शुल्क आकारणी करण्याच्या अटीसह परवानगी दिली आहे. आता सशुल्क सुविधांचा प्रस्ताव कंपनीने महापालिकेला सादर केला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

५१ हेक्टरवर हिरवळ

सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकून ११० हेक्टर जमीन तयार करण्यात आली आहे. त्यापैकी ७० हेक्टर जमीन ही हिरवळ आणि वृक्षलागवड व नागरी सुविधांसाठी राखीव ठेवली आहे. त्यात ४.८ हेक्टरचा रस्ता दुभाजकाचा भाग आहे. हा भाग टाटा कंपनीतर्फे विकसित केला जाणार आहे. तर ११ हेक्टरमध्ये पालिकेने समुद्री पदपथ बनवला आहे. प्रियदर्शीनी उद्यान ते वरळी परिसरापर्यंत तब्बल ७ किमी लांबीच्या जागेत ही हिरवळ व नागरी सुविधा तयार केल्या जाणार आहेत. या जागेवर एकसंध हिरवळ तयार करण्याचे हे संपूर्ण काम रिलायन्स कंपनीला देण्यात आले होते.

या सुविधा मिळणार

पक्षी निरिक्षण मार्ग, सनसेट व्ह्यू पॉईंट, मुलांसाठी मैदाने, योगासाठी स्वतंत्र जागा, पाळीव प्राण्यांसाठी उद्यान, क्रीडांगण अशा सुविधा यात देण्यात येणार आहेत.