मुंबई : कोस्टल रोडवर अल्पवयीन मुलाने वडिलांची बीएमडब्ल्यू मोटार चालविताना संरक्षक कठड्याला धडक दिल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी मुलासह त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हाजी अली दर्ग्याजवळील उत्तरवाहिनीवर १८ ऑक्टोबर रोजी सकाळी हा अपघात झाला. मोटार चालविणाऱ्या १७ वर्षीय मुलाकडे वैध वाहनचालक परवाना नसतानाही त्याला वडिलांनी मोटार चालविण्यास दिल्याचा आरोप आहे. अपघातावेळी मुलगा आणि त्याचा मित्र अमली पदार्थाच्या प्रभावाखाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री गस्त घालत असलेल्या पोलीस पथकाला १८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता हाजी अली दर्ग्याजवळील उत्तरवाहिनीवर बीएमडब्ल्यू मोटारीने संरक्षक कठड्याला धडक दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता मोटार १७ वर्षीय मुलगा चालवित असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत त्याचा मित्रही मोटारीत होता. दोघेही दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील रहिवासी आहेत.

चौकशीदरम्यान, वडिलांनीच मोटार चालविण्यास दिल्याचे मुलाने सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला. मुलाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. त्याने भरधाव आणि निष्काळजीपणे मोटार चालविल्याने अपघात झाल्याचा आरोप आहे. तसेच अपघाताच्या वेळी मुलगा व त्याचा मित्र अमली पदार्थ वा अन्य नशेच्या प्रभावाखाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, नशेबाबत वैद्यकीय किंवा न्यायवैद्यक तपासणीचा निष्कर्ष अद्याप स्पष्ट झालेला नाही. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

या प्रकरणी मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ आणि १८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने परवाना नसताना मोटार चालविल्याबरोबरच त्याला मोटार उपलब्ध करून देण्याच्या वडिलांच्या भूमिकेचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.