मुंबई : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व मुंबईतून थेट भाईंदरपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. हा महाप्रकल्प आंतरबदल व जोडरस्त्यासह सुमारे ६० किलोमीटरचा असून वर्सोवा आणि भाईंदर हे भाग किनारा रस्त्याने जोडले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी भाईंदर येथे अत्याधुनिक कास्टिंग यार्ड उभारण्यात आले आहे.
मरीन ड्राईव्ह ते वरळी हा दक्षिण सागरी किनारा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर मुंबई महापालिकेने आता उत्तर मुंबईला जोडणाऱ्या वर्सोवा – दहिसर – भाईंदर या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर – भाईंदर जोड रस्ता अशा एकूण सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली.
या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी भाईंदर येथे अत्याधुनिक कास्टिंग यार्ड उभारण्यात आले आहे. या कास्टिंग यार्डमध्ये प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध पूर्वनिर्मित काँक्रीट संरचनात्मक घटकांचे (प्रिकास्ट एलिमेंट्स) उत्पादन करण्यात येणार आहे. अभिजीत बांगर यांनी या कास्टिंग यार्ड प्रकल्प स्थळास प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.
भाईंदर येथील कास्टिंग यार्डमध्ये रस्ते प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध पूर्वनिर्मित काँक्रीट संरचनात्मक घटकांची निर्मिती अत्याधुनिक व नियंत्रित वातावरणात करण्यात येते. यामध्ये साचे तयार करणे, त्यामध्ये काँक्रीट ओतणे, आवश्यक तांत्रिक प्रक्रियेनंतर घटकांना अपेक्षित मजबुती प्राप्त होण्यासाठी ‘क्युअरिंग’ करणे तसेच तयार झालेल्या घटकांची काटेकोर गुणवत्ता तपासणी करणे, अशा विविध प्रक्रिया राबविण्यात येतात. येथे तयार होणारे ‘प्रीकास्ट’ घटक पुढे प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी वाहून नेऊन त्यांची नियोजनबद्ध पद्धतीने उभारणी केली जाते.
दहिसर – भाईंदर जोडरस्त्याच्या कामाला डिसेंबर २०२८ चे लक्ष्य
दहिसर – भाईंदर जोड रस्ता मुंबई आणि मिरा- भाईंदर परिसरातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम यांच्यात थेट आणि जलद रस्ते संपर्क निर्माण होणार आहे. या रस्ते प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ५.१३५ किलोमीटर आहे. त्यात उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता, खाडीवरील उन्नत संरचना, खारपाण जमीन क्षेत्रावरील उन्नत मार्ग, वाहतूक विखुरण्यासाठी जोडमार्ग व आंतरबदल आणि उड्डाणपूल आदी विविध प्रकारच्या अभियांत्रिकी संरचनांचा समावेश आहे. दहिसर – भाईंदर जोड रस्ता प्रकल्पातील सुमारे ३.८३ किलोमीटर लांबीचा व ४५ मीटर रूंदीचा मुख्य उन्नत रस्ता हा मुंबई किनारा रस्त्याचा (उत्तर) अंतिम भाग आहे. या ठिकाणी देखील बांगर यांनी भेट दिली व पाहणी केली.
या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. विविध प्राधिकरणांसह मिरा – भाईंदर महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे. सुरक्षाविषयक प्रमाणित कार्यप्रणालीचे अत्यंत काळजीने पालन करावे. कामे सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्यस्थळी रस्ता रोधक (बॅरिकेडिंग) उभारावे, कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावी. सदर काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (मुंबई किनारा रस्ता – उत्तर) वैभव गांधी यांच्यासह संबंधित अभियंते, सल्लागार यावेळी उपस्थित होते.
