मुंबई: सागरी किनारा महामार्गाला लागून असलेल्या पदपथावर मुंबई महापालिकेने अत्याधुनिक असे बायो टॉयलेट अर्थात जैव शौचालये तयार केली आहेत. ही शौचालये सशुल्क स्वरुपाची असून त्याचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. अनेक सोयीसुविधांनी युक्त अशी ही शौचालये तयार करण्यात आली आहेत. मुंबई महापालिकेने धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे.

या मार्गालगतच भलामोठा विस्तीर्ण असा साडे सात किमी लांबीचा समुद्री पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने सहा अत्याधुनिक प्रकारच्या जैव विघटनक्षम शौचालयांची (बायो-टॉयलेट्स) उभारणी करण्यात आली आहे. किनारी रस्त्यावरील (कोस्टल रोड) विहार क्षेत्रावर पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक २, ४, ६, ११, १२ आणि १४ या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

सागरी किनारा मार्गावर ठिकठिकाणी विहार क्षेत्र (Promenade) निर्माण करण्यात आले आहे. समुद्रकिनारी उभारलेल्या या विहारक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक, पर्यटक येतात. त्यांच्यासाठी स्वच्छताविषयक उत्तम सुविधा देण्याकरीता घनकचरा व्यवस्थापन विभागाने जैव विघटनक्षम शौचालये (बायो-टॉयलेट्स) उपलब्ध करून दिली आहेत. ही स्वच्छतागृहे सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असून सागरी मार्ग परिसराच्या सुशोभीकरणात भर घालणारी आहेत.

इथे आहेत प्रसाधनगृहे …

धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) विहार क्षेत्रावरील पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक २, अमरसन्स उद्यानाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ४, आकृती इमारत वाहनतळाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ६, हाजी अली जंक्शन; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक ११, वरळी दुग्धशाळेसमोर; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक १२, बिंदूमाधव ठाकरे चौकाजवळ; पादचारी भुयारी मार्ग (पीयूपी) क्रमांक १४, खान अब्दुल गफार खान मार्गावर बिंदूमाधव ठाकरे चौकाच्या उत्तर दिशेला; अशा एकूण सहा ठिकाणी या सुविधा आहेत.

या आहेत सुविधा …

या अत्याधुनिक मॉड्युलर जैव विघटनक्षम शौचालयाचा अर्थात बायो टॉयलेटचा आकार २० × २० × ८ फूट असून ते सौरऊर्जा प्रणालीवर कार्यरत राहील. यामध्ये महिलांसाठी २ (१ पाश्चिमात्य आणि १ भारतीय शैलीचे), पुरुषांसाठी २, बालकांसाठी १ आणि दिव्यांगांसाठी १ पाश्चिमात्य शैलीचे शौचालय आहे. तर, ६ युरिनल, ३ वॉशबेसिन, ३ सेन्सर आधारित आरसे, ३ साबण डिस्पेन्सर, १ सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, १ सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, १ हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, ३ हजार लीटर क्षमतेचे १ डीआरडीओ बायो-डायजेस्टर आदी सुविधांचाही यात समावेश आहे.

सशुल्क वापराचे दर निश्चित ..

नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व नीटनेटकी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याकरीता नाममात्र वापर शुल्क ठेवण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या धोरणानुसार, नव्याने उभारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयासाठी ठरविण्यात आलेल्या दरांप्रमाणे वापर शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी ५ रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.