मार्चपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची उद्धव ठाकरे यांची माहिती

शहराच्या पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाकांक्षी किनारा रस्त्याचे (कोस्टल रोड) श्रेय घेण्यासाठी भाजप व शिवसेनेत चढाओढ लागली असतानाच आगामी पालिका निवडणुकांआधी या रस्त्याचे भूमिपूजन करण्याचा मुहूर्त मात्र अखेर हुकला. विविध विभागांकडून परवानगी मिळण्यास झालेल्या विलंबामुळे आता या रस्त्याचे काम पुढील पावसाळ्यानंतर सुरू होईल. या रस्त्यासाठी गिरगाव किनाऱ्यानजीक सुरू असलेल्या भूतांत्रिक चाचण्यांची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मरिन लाइन्स ते कांदिवली दरम्यानच्या ३४ किलोमीटर लांबीच्या किनारा रस्त्याचे काम एक ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. तब्बल १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या रस्त्याच्या आराखडय़ात वारंवार बदल करण्यात आले. त्यातच वर्सोवा येथील खारफुटीच्या संभाव्य विनाशामुळे संपूर्ण किनारा रस्त्याचीच पर्यावरणीय परवानगी नाकारली जाण्याचे संकेत मिळाल्यावर पालिकेने मरिन लाइन्स ते वरळी या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्याचे ठरवले. मात्र आता या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजनही निवडणुकांआधी होण्याची शक्यता मावळली आहे. नरिमन पॉइंट ते प्रियदर्शिनी पार्क या किनाऱ्यालगच्या बोगद्यासाठी भूतांत्रिक चाचण्या सुरू आहेत. शनिवारी या प्रकल्पाच्या कामाची उद्धव ठाकरे यांनी आयुक्त अजोय मेहता यांच्यासह पाहणी केली.

या प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला झालेली सुरुवात ही समाधानाची बाब आहे. समुद्राखाली पाहणी सुरू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तळाशी असलेले दगड हे किनारपट्टी रस्त्याच्या बोगद्याच्या कामासाठी योग्य आहेत. हे काम सुरू असताना गिरगाव चौपाटीच्या सौंदर्याला कुठेही धक्का लागणार नाही.

चौपाटीहून निघालेला बोगदा प्रियदर्शिनी पार्कजवळ बाहेर पडेल. त्यामुळे काम सुरू असताना वाहतुकीलाही अडथळा येणार नाही, असे सांगतानाच या प्रकल्पाचे भूमिपूजन जून २०१७ मध्ये केले जाईल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भूमिपूजनासाठी निवडणुकीचा मुहूर्त हुकला आहे.

प्रकल्पाचे भूतांत्रिक सर्वेक्षण सुरू असून त्याचा अहवाल कंत्राटदारांना उपलब्ध होईल. पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंकचा असून २०१९ पर्यंत तो पूर्ण होईल. दुसरा टप्पा वांद्रे ते कांदिवली सीलिंकचा आहे. अहमदाबादचा तिसरा टप्पा प्रस्तावित आहे. नौदल, तटरक्षक दल, मेरीटाइम बोर्ड, राज्य पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली असून आता केंद्रीय पर्यावरण खात्याही मंजुरी लवकरच मिळेल, असे ठाकरे यांनी सांगितले.

नरिमन पॉइंट ते प्रियदर्शिनी पार्क हा ३.४ किलोमीटर लांबीचा जमिनीखालील बोगदा, त्यानंतर प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस हा ३.८ किलोमीटरचा रस्ता, बडोदा पॅलेस ते वरळीपर्यंतचा २.७ किलोमीटरचा तिसरा मार्ग या रीतीने एकाच वेळी काम सुरू करून किनारामार्ग वेगाने पूर्ण करण्याची योजना आहे.

श्रेयासाठी संघर्ष

दीर्घ काळ रखडलेल्या या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर तो महापालिकेकडून राबविला जात असल्याने शिवसेना त्याचे श्रेय घेण्यासाठी आग्रही आहे.