Mumbai Coastal Road Tunnel Car Fire: मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात बुधवारी दुपारी दक्षिण दिशेच्या लेनवर एका चालत्या गाडीने पेट घेतला. गाडीला आग लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून बोगद्यात शिरलेल्या गाड्या एकाच जागी उभ्या आहेत. दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. या घटनेत अद्याप कुणीही जखमी झालेले नाही. दरम्यान उत्तर दिशेच्या लेनने वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कोस्टल रोड अर्थात धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड हा आठ पदरी महामार्ग असून दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स ते उत्तर मुंबईतील कांदिवलीपर्यंत महामार्गावरून प्रवास करता येतो. हा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा असलेला महामार्ग आहे.
मुंबई अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गाडीला लागलेली आग तात्काळ विझवण्यात यश आले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात लोक आपल्या गाड्या सोडून आगीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
बोगद्यात गाडीला जेव्हा आग लागली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने या थरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे. शौनक मोदी नामक एक्स युजरने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “मी याआधी अशा घटनेचा कधीही अनुभव घेतला नव्हता. आम्ही वरळीमधून कोस्टल रोडवर प्रवेश केला. पुढच्या काही मिनिटांत आमच्या पुढून लोक धावत येताना दिसले. आम्ही एका धावत येणाऱ्या व्यक्तीला विचारले की, पुढे काय झाले आहे. तो म्हणाला की, तिथे आग लागली आहे. अनेक लोक आपली गाडी तिथेच सोडून बाहेर पळण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. लोकांनी गाड्या तिथेच सोडल्यामुळे बोगद्यात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.”
I have never experienced anything like it. Entered the Coastal Road tunnel from Worli and in a couple of minutes saw 100s of people running towards us. Asked one person and he said “aage aag lagi hai”.
— Shaunak Modi (@Pugdandee) July 15, 2026
I’m not sure what was on fire or if there even was one, but many people just… pic.twitter.com/W3vnWb1g41
दरम्यान या घटनेमुळे कोस्टल रोडच्या बोगद्यात वाहतूक कोंडी झाली. आपत्कालीन यंत्रणांनी आगीची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू केले. बोगद्यातील गाड्यांमधील लोकांना सुरक्षित बाहेर काढले गेले आहे. आग का लागली? या कारणांचा शोध घेतला जात आहे.

वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनी या घटनेवर बोलताना म्हटले, गाडीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रीच कँडी ते नरीमन पॉईंट पर्यंतच्या बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. तरीही वाहतूक शाखेचे पोलीस तपास करत आहेत. तसेच बोगद्यातील गाड्या बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
शौनक मोदी यांनी केलेली पोस्ट काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. “कोस्टल रोडवर झालेल्या दुर्घटनेवर संबंधित नागरिकाने व्यक्त केलेली चिंता खरी आहे. बोगद्यात अशी एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ वाहतूक कोंडी सोडण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा असावी.
