लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘मुंबई राडारोडा नियंत्रण व मागोवा प्रणाली’ अनिवार्य केली असताना मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा प्रकल्पांतर्गत हाजी अली ते पीडीपी गार्डन परिसरात सुरू असलेल्या भरावासाठी खासगी बांधकाम प्रकल्पांमधून परवानगीविना आणलेल्या उत्खननाच्या मातीचा वापर करण्यात आल्याचे महापालिकेच्या पाहणीत उघड झाले आहे. याप्रकरणी सागरी किनारा मार्गाच्या कंत्राटदार कंपनीला महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित अनधिकृत मातीचा वापर तातडीने थांबविण्याचे निर्देश देतानाच, ७२ तासांत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरु असलेले पुनर्विकास प्रकल्प, मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि इमारतींच्या पुनर्बांधणीमुळे दररोज अंदाजे ८,००० मेट्रिक टन बांधकाम-पाडकाम कचरा आणि उत्खननातून निघणारे साहित्य निर्माण होते. बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणारा हा राडारोडा रात्रीच्यावेळी रस्त्यावर, कचऱ्यात टाकण्याचे प्रकार घडत होते. तसेच अनेकदा हा राडारोडा टाकून कांदळवनात भरही टाकली जात होती. या सगळ्याला आळा घालण्यासाठी आता ‘मुंबई राडारोडा नियंत्रण व मागोवा प्रणाली’ अनिवार्य केली आहे. विकासक, कंत्राटदार, शासकीय संस्था, वाहतूकदार तसेच राडारोड्यावर प्रक्रिया किंवा पुनर्वापर करणाऱ्या संबंधित घटकांना ‘मुंबई राडारोडा नियंत्रण व मागोवा प्रणाली’च्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच विहित नमुन्यात राडारोड्याच्या विल्हेवाटीचा आराखडा सादर करणेही आवश्यक आहे. मात्र या नियमाचे पालिकेच्या प्रकल्पांतर्गत उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी हाजी अली कोस्टल परिसर ते पीडीपी गार्डन या भागाची नियमित पाहणी केली. त्यावेळी भरावाचे काम सुरू असल्याचे आढळले. त्यानंतर वाहनांची आणि वाहतुकीशी संबंधित चलनांची तपासणी केली असता, भरावासाठी वापरण्यात येणारी माती व उत्खननातील साहित्य मुंबईतील खासगी विकासकांच्या बांधकामस्थळांवरून आणले जात असल्याचे समोर आले. मात्र, संबंधित विकासक आणि वाहतूकदारांनी उत्खननातील माती अथवा बांधकामाचा राडारोडा वाहून नेण्यासाठी महापालिका किंवा सक्षम प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे कंत्राटदाराला घनकचरा व्यवस्थापन विभागाने नोटीस बजावली आहे.

कंत्राटदाराने मातीचा स्रोत, वाहतुकीची वैध परवानगी, रॉयल्टीची चलने आणि वापरलेल्या साहित्याचे भू-तांत्रिक चाचणी अहवाल आदी कागदपत्रांसह खुलासा सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, अधिकृत स्रोताबाबत महापालिकेची स्पष्ट परवानगी मिळेपर्यंत अनधिकृत साहित्याचा वापर करून भराव करण्याचे काम तातडीने थांबवावे आणि आतापर्यंत वापरलेल्या साहित्याचा तपशील सादर करावा, असेही बजावण्यात आले आहे.

पोर्टलवर २३४ जणांची नोंदणी

पालिकेच्या घनकचरा विभागाने १२ ऑक्टोबरपासून राडारोड्याची अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यास सरुवात केली आहे. बांधकाम व पाडकामातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिकेने एमडीसीटीएस पोर्टलवरील नोंदणी मोहीम तीव्र करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले आहेत. या ठिकाणांची नोंदणी अनिवार्य असून, संबंधित विकासक आणि प्रकल्प राबविणाऱ्यांना नोटिसा बजावून नोंदणी व नियमांचे पालन सुनिश्चित करण्याचे आदेश सहाय्यक अभियंत्यांना (घनकचरा व्यवस्थापन) देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण २३४ नोंदणी झाल्या आहेत. त्यामध्ये १२८ बांधकाम व्यावसायिक, ४५ वाहतूकदार, १९ महापालिका कंत्राटदार, १९ कॉर्पोरेट संस्था, सहा सरकारी संस्था आणि १७ कचरा खरेदीदारांचा समावेश आहे. नागरिकांकडून अद्याप नोंदणी झालेली नाही. नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी बांधकाम व पाडकामातील कचरा निर्माण होणाऱ्या सर्व ठिकाणांचा समावेश करण्यासाठी प्रत्येक विभागातील सहाय्यक अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अशा ठिकाणांची ओळख पटवून संबंधित विकासकांना नोटिसा द्याव्यात आणि नोंदणी पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करावा, असे निर्देश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.